
नगर : कलेवर निस्सीम प्रेम असणं म्हणजे नेमकं काय, याची प्रचीती ‘ईठा’च्या (Eetha Movie Teaser)अवघ्या २ मिनिटे ३ सेकंदांच्या दमदार टीझरमधून येते. “पान में पान चखना हो तो मीठा, और तूफान को नाचते देखना हो तो ईठा” ही प्रभावी टॅगलाइन ऐकताच प्रेक्षकांना एका असामान्य कलाकाराच्या जीवनप्रवासाची झलक पाहायला मिळते. हा सिनेमा छावा फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर(Lakshaman Utekar) यांनी दिग्दर्शित केला आहे.
या सिनेमातील गाण्यांना अजय अतुल यांनी संगीत दिले आहे. त्यामुळे या भन्नाट कॉम्बिनेशनमुळे लोककलावंत स्त्रीच्या संघर्षाची जीवनगाथा एका उंचीवर घेऊन जाईल यात शंका नाही. या सिनेमाचे लिखाण दोन स्पेशल, उत्तर, भूमिका प्रकाशदार कलाकृती देणाऱ्या क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे.
नक्की वाचा : लग्नपत्रिकेवर आता वर-वधूच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार
चित्रपटाची कथा नेमकी काय? (Eetha Movie Teaser)
विठाबाईंची कलेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग तर अंगावर शहारे आणणारा आहे. एका तमाशाच्या प्रयोगादरम्यान त्या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. रंगमंचावर सादरीकरण सुरू असतानाच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. मात्र, कलेची ओढ इतकी प्रबळ होती की, त्यांनी पडद्यामागे जाऊन बाळाला जन्म दिला आणि काही मिनिटांतच पुन्हा रंगमंचावर परत येत आपली कला रसिकांसमोर सादर केली. कलाकाराच्या समर्पणाची ही कथा आजही मराठी संस्कृतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाते.
अवश्य वाचा : १ जुलैपासून खिशाला कात्री; रेल्वे तिकिटांपासून LPG पर्यंत बदलणार ७ नियम
टीझर नेमका कसा? (Eetha Movie Teaser)
‘ईठा’च्या टीझरमध्ये विठाबाईंच्या संघर्षाचा, जिद्दीचा आणि कलेवरील अपार प्रेमाचा प्रत्यय येतो. त्यामुळे हा सिनेमा केवळ एका कलाकाराची बायोपिक न राहता, लोककलेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या एका असामान्य स्त्रीचा प्रेरणादायी प्रवास ठरणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळतात. ‘ईठा’ हा सिनेमा महाराष्ट्राच्या लोककलेचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात विठाबाईंची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारत असून, तिच्या या नव्या आणि आव्हानात्मक भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘ईठा’च्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. अखेर हा बहुप्रतीक्षित टीझर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘कॉकटेल २’ या चित्रपटासोबतही ‘ईठा’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तमाशाच्या फडातून इतिहास घडवणाऱ्या विठाबाईंची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी आता मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


