Fraud : राहाता : शहरात बुधवारी (ता. २६) एका दुकानदार महिलेला साधूच्या रुपात आलेल्या दोघांनी गंडा (Swindle) घातला. तिला बोलण्यात गुंतवून आर्शिवाद देण्याचा बहाणा केला. त्यांच्या बोलण्याला ती महिलाही फसत गेली. याचा गैरफायदा (Misuse) घेत त्या भोंदूंनी तिच्या हातातील आंगठ्या आणि 20 हजार रुपये घेऊन पसार झाले. राहाता शहरात प्रवरा बँकेसमोरील (Pravara Bank) साई दर्शन टॉवर्समध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
नक्की वाचा : श्रीगोंदा शहरात अश्लील बॅनरवर पोलिसांची कारवाई; नगर परिषद घेणार ॲक्शन?
परिसरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २६) दुपारच्या शांत वेळेत साधूचा वेश धारण केलेले दोन तरुण साई दर्शन कॉम्प्लेक्समधील गिफ्टच्या दुकानात आले. त्यावेळी दुकानात महिला दुकानदार एकटीच होती. या दोघांनी सुमारे पाच ते दहा मिनिटे तिच्याशी विविध विषयांवर बोलत तिला संभाषणात गुंतवून ठेवले. बोलता-बोलता त्यांनी महिलेला संमोहित केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तिच्या नकळत गल्ल्यातील रोख रक्कम तसेच हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेत दोघेही दुकानातून पसार झाले. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ (Fraud)
दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वी वारकरी वेशात आलेल्या चार तरुणांनी तालुक्यातील एकरुखे शिवारातील एका वस्तीवर सरकारी वकिलाच्या घरात प्रवेश करून महिलेवर चाकूचा धाक दाखवत सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली होती. या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साधू, वारकरी किंवा अन्य धार्मिक व्यक्तींचा वेश धारण करून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर नागरिकांनी अंधविश्वास न ठेवता सावध राहणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राहाता शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून लूटमार, चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन गस्त वाढवावी तसेच संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.



