
Goda to Narmada yatra : नगर : ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा (Goda to Narmada yatra) 2026’ चे आज सायंकाळी ६ वाजता अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar city) उत्साहात आगमन झाले. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी जलयात्रेचे जंगी स्वागत करत जलसंवर्धनाच्या (Water conservation) या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नक्की वाचा : राहुरी बस स्थानकाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे : प्रसाद तनपुरे

महायुतीचे सर्व नेते मोठ्या संख्येने सहभागी
अहिल्यानगर शहरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप महायुतीचे सर्व नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर माळीवाडा मार्गे पायी चालत जलयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे पुढे सरकली. विशाल गणपती येथे डॉ.सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पारंपरिक कलशासह आरती करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, तर महिलांनी फुगडी खेळत पारंपरिक उत्सवाचे रंगतदार दर्शन घडवले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की (Goda to Narmada yatra)
यावेळी बोलताना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही जनजागृती आणि प्रेरणेचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या यात्रेत अहिल्याबाई होळकर यांनी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.

यात्रेचे उत्साहात स्वागत
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी महेश्वर असा या यात्रेचा प्रवास आखण्यात आला आहे. या यात्रेद्वारे पाण्याचे महत्त्व, जलसंधारणाची गरज आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा संदेश दिला जात असून महायुती सरकारचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे उत्साहात स्वागत केले, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली

शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात
दरम्यान, या जलयात्रेचा भव्य शुभारंभ श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ व समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन करण्यात आले.

पुढील तीन वर्षांत जिल्ह्यातील एकही जलसंपदा प्रकल्प प्रलंबित राहणार नाही
यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पाणी व्यवस्थापनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, महायुती सरकारच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यातील एकही जलसंपदा प्रकल्प प्रलंबित राहणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पाणी सुरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प
ही जलयात्रा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रम नसून, जलसंवर्धनाबाबत जनजागृती घडवणारा आणि भविष्यासाठी पाणी सुरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार रामराव वडकुते, आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते तसेच विविध संत-महंत, वारकरी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय ग्रामस्थ, महिला भगिनी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक जलयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


