
Government Medical College : नगर : अहिल्यानगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Medical College) प्रथम वर्षाच्या १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीबीएसच्या (MBBS) प्रथम वर्षाला १०० विद्यार्थी प्रवेशित करण्यास राज्य शासनाने (State Government) मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १६ सप्टेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
राज्य शासनाने प्रवेशास दिली मान्यता
अहिल्यानगर येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास यापूर्वीच शासनाने परवानगी दिली होती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली होती. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे करण्यात आलेले प्रथम अपीलही फेटाळण्यात आले होते.
यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे द्वितीय अपील करण्यात आले. मंत्रालयाने १५ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात अहिल्यानगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशास परवानगी देण्याबाबत निर्देश दिले. या आदेशाच्या आधारे राज्य शासनाने आता प्रवेशास मान्यता दिली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निर्देशांचे पालन करावे लागणार (Government Medical College)
ही परवानगी काही अटी व शर्तींच्या अधीन आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे संलग्निकरण प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षणासाठी वेळोवेळी निश्चित केलेले नियम, मानके आणि निर्देशांचे पालन करावे लागणार आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, मंजूर १०० जागांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देता येणार नाही. केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची ही परवानगी केवळ २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लागू आहे. पुढील वर्षी प्रवेश देण्यापूर्वी या परवानगीचे नूतनीकरण करून घेणे बंधनकारक राहणार आहे.
या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली असून, नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीला आता अधिकृत सुरुवात होणार आहे.


