Kharif crops : कर्जत : तालुक्यास यंदा मे महिन्यातच १५ दिवसांत वरूणराजाने तब्बल साडेतीनशे मिमी पावसाची (Rain) नोंद करीत उच्चांक गाठला होता. तर चक्क उन्हाळ्यात ओढे, नाले, बंधारे आणि तलाव ओसंडून वाहिले. शेतास तलावाचे स्वरूप पाहायला मिळाले. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पाण्याचा वापसा होताच खरीप पेरणी (Kharif crops) हाती घेतली. कर्जत तालुक्यात ३० जून अखेर ऊसाशिवाय खरीप क्षेत्राची पेरणी ५१ हजार ३५५ हेक्टर झाली. यात ६५ टक्के पेरणी अहवाल कृषी विभागाकडे नोंद आहे. मात्र, पुन्हा एकदा जून महिन्यात पावसाने दडी मारली. आणि काही मोजक्या भागात त्या खरीप पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली. जून महिन्यात कर्जत (Karjat) तालुक्यात अवघा ७२ मिमी पावसाची नोंद झाली.
नक्की वाचा : रेल्वेभाडेवाढ ते तत्काळ तिकीट;भारतीय रेल्वेच्या नियमामध्ये आजपासून मोठे बदल
वापसा होताच खरीप पेरणीची लगबग सुरू
कर्जत तालुक्यात मे महिन्यात मान्सून पावसाने विक्रमी हजेरी लावत यंदा दमदार पाऊस होणार, अशी आशा पल्लवित केल्या. शेतकरी वर्ग समाधानी झाला. पावसाने उघडीप दिल्यानंतर वापसा होताच खरीप पेरणीची लगबग सुरू झाली. शेतकऱ्यांनी उडीद, तूर, मूग, बाजरी, मका, कांदा आणि कापूस पेरणी हाती घेतली. कर्जत तालुक्यात खरीप पेरणी लक्ष्यांक ७८ हजार ५२६ असताना ३० जून अखेर ५१ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. ६५ टक्के खरीप पेरणी झाली असल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी शीतल पाचारणे यांनी दिली.
अवश्य वाचा : शनैश्वर देवस्थान विरोधात विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
ढगाळ हवमानाने किडीचा प्रादुर्भाव (Kharif crops)
शेतातली पाण्याची पातळी वाढली असल्याने पेरणी झालेली ठिकाणी उगवण देखील वेळेत पहावयास मिळाली. मात्र जून महिन्यात परत मान्सून पावसाने चांगलीच दडी मारली. मे महिन्यात १५ दिवसांत तब्बल ३५० मिमी पावसाने कर्जत तालुक्यात नोंद लावली. मात्र, जून महिन्यात अवघा ७२ मिमी पाऊसच झाला. अनेक ठिकाणी पाण्याचे सरोत भरले असल्याने शेतकऱ्यांची वेळ निभावली. परंतु काही ठिकाणी उगवलेल्या खरीप पिकांनी मान्सून पावसाच्या लांबणीमुळे माना टाकण्यास सुरुवात केली. त्यात ढगाळ हवमानाने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जुलै महिन्यात मान्सून पावसाच्या दमदार हजेरीकडे शेतकरी बांधव डोळे लावून बसले आहेत. कर्जत तालुक्यात ७८ हजार ५२६ खरीप पेरणी लक्ष्यांक उद्दिष्ट असताना आजमितीस ५१ हजार ३५५ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक उडीद १७ हजार ८०३, मका १५ हजार ६६५, तूर ११ हजार ८१ त्या पाठोपाठ बाजरी ३ हजार २८७, कापूस १ हजार २५४, कांदा १ हजार १०८ आणि मूग १ हजार १० हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली आहे.