Kukadi Seized by ADCC : नगर : जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील वातावरण तापताना दिसत आहे. पिंपळगाव पिसा येथील माजी आमदार राहुल जगताप यांच्या कुकडी सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा सहकारी बँकेच्या पथकाने कारवाई करत कारखाना सील केला. सुमारे ३७० कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या प्रकरणामुळे ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कारवाईच्या टायमिंगमुळे सहकारातील राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.
कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई; ३७० कोटींच्या थकबाकीपोटी मालमत्ता ताब्यात
‘हे’ नेते टार्गेट
जिल्हा बँकेची निवडणूक जवळ येत असताना कुकडी कारखान्यावर झालेली कारवाई ही केवळ आर्थिक वसुलीची प्रक्रिया आहे की त्यामागे सहकारातील राजकीय समीकरणांचाही संदर्भ आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. राम शिंदे यांच्या बाजूने उभे राहिलेल्या सहकारातील नेत्यांच्या संस्थांवरच कारवाई होण्याचे सत्र सुरू झाले आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नुकतेच भानुदास मुरकुटे यांच्या अशोक सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत आणि आता राहुल जगताप यांच्या ‘कुकडी’वर कारवाई झाली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या टायमिंगची चर्चा सहकार क्षेत्रात रंगली आहे.
जगतापांचा विरोधकांना इशारा (Kukadi Seized by ADCC)
दरम्यान, कारखाना सील झाल्यानंतर राहुल जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना थेट इशारा दिला आहे. कुकडी कारखाना अडचणीत यावा यासाठी काही ‘हितचिंतक देव पाण्यात बुडवून बसले आहेत’, असा टोला त्यांनी लगावला. यापूर्वी तालुक्यातील एका कारखान्याला जप्तीच्या अनेक नोटिसा आल्या, कारखाना जप्त झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या; मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही, असा संदर्भ देत जगताप यांनी कुकडीबाबतही आशावाद व्यक्त केला. ‘कुकडी पुन्हा दिमाखात सुरू होईल’, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या कारवाईमुळे आपण किंवा कारखाना खचणार नसल्याचे संकेत दिले.
जिल्हा परिषद शाळेंमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची भरती करा : खासदार निलेश लंके
‘कुठल्याही परिस्थितीत लढणार आणि जिंकणार’ (Kukadi Seized by ADCC)
विशेष म्हणजे, या कारवाईचा आणि जिल्हा बँक निवडणुकीचा कोणताही संबंध नसल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. उलट, ‘आपण निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढणार आणि जिंकणार’, असे सांगत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. त्यामुळे कुकडी कारखान्यावरची कारवाई ही एका थकीत कर्जप्रकरणापुरती मर्यादित राहणार की तिचे पडसाद आगामी जिल्हा बँक निवडणुकीत उमटणार, याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. कारखाना सील होण्याच्या कारवाईनंतरही निवडणूक लढण्याचा निर्धार जगताप यांनी कायम ठेवल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.



