KVK : नगर : योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक व्यवस्थापनाच्या जोरावर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आंबा उत्पादनात आणि विक्रीत एक नवा इतिहास रचला आहे. जून २०२६ मध्ये झालेल्या आंबा फळांच्या लिलावातून विद्यापीठाने तब्बल १ कोटी ६९ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. कृषी क्षेत्रासमोर आधुनिक व्यवस्थापनाचा एक नवा आदर्श या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा : जिहादी प्रवृत्तींना इथल्या मातीत राहण्याचा अधिकार नाही; आमदार संग्राम जगताप आक्रमक
९ हजारांहून अधिक झाडांमधून विक्रमी महसूल
विद्यापीठाच्या बियाणे विभाग आणि उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेमध्ये आंब्याची विस्तीर्ण बागा आहेत. या बागेतील एकूण ९,२०३ झाडांपासून हे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने केशर, लंगडा, वनराज, तोतापुरी या वाणांचा समावेश होता. हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यामागे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांचे अचूक मार्गदर्शन कारणीभूत ठरले. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळे ही मोठी झेप घेता आली.
नक्की पहा : दिल्ली गेट परिसरात पुन्हा वाहनाची दुभाजकाला धडक
कृषी क्षेत्रातून कौतुक (KVK)
संपूर्ण आंबा पिकाचा लिलाव हा ई-निविदा प्रणालीद्वारे करण्यात आला. यामुळे योग्य स्पर्धा निर्माण होऊन विद्यापीठाला आपल्या उत्पादनाचा सर्वोत्तम दर मिळवता आला. हवामान बदलाच्या आणि अनिश्चिततेच्या काळात केवळ योग्य शास्त्रीय दृष्टिकोन आणि चोख व्यवस्थापन ठेवून शेतीतून किती मोठे आर्थिक उत्पन्न घेता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण राहुरी कृषी विद्यापीठाने देशातील शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल कृषी क्षेत्रातून विद्यापीठाचे मोठे कौतुक होत आहे.



