
Life Certificate : नगर : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून ३० जुलै २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. योजनेचे अनुदान नियमितपणे सुरू राहण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन पारनेर तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी केले आहे.
हेही वाचा : ‘या’ तारखेला वाजणार शाळेची घंटा; ‘ऑनलाइन’च्या चर्चांना पूर्णविराम
घरबसल्या प्रमाणपत्र
शासनाच्या नव्या निर्णयानुसार हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी ५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. स्मार्टफोन असलेले लाभार्थी प्ले स्टोअरवरून ‘Beneficiary Verification’ व ‘Aadhaar Face RD’ हे ॲप डाउनलोड करू शकतात. या ॲपवर आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने नोंदणी करून चेहरा किंवा बोटांच्या ठशांची पडताळणी केल्यानंतर हयातीचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, अशा लाभार्थ्यांसाठी सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन हयातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ते संबंधित तलाठी यांच्याकडे सादर करावे.
नक्की पहा : अहिल्यानगरमधील गुजर गल्लीत दोन अलिशान वाहने जळून खाक; घातपाताचा संशय
कागदपत्रे (Life Certificate)
या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांनी स्वतःच्या आधार कार्डची छायाप्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यांचा अद्ययावत मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न (मॅपिंग) असणे आवश्यक असून त्यानंतरच हयातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी विहित मुदतीत आवश्यक बाबींची पूर्तता करून हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे, असेही तहसीलदार श्रीमती सौंदाणे यांनी सांगितले आहे.


