
Little girl dies of electric shock : नगर : अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या साडेतीन वर्षांच्या प्रीती गांगर्डे या निष्पाप चिमुरडीचा विजेच्या खांबाला शॉक लागून जागीच मृत्यू (Little girl dies of electric shock) झाल्याच्या हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनंतर महावितरणच्या कथित निष्काळजीपणाविरोधात संतापाची लाट उसळली असून या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने महावितरण कार्यालयाचे (Mahavitaran Office) अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
नक्की वाचा : बोधेगाव येथे गावठी कट्टा बाळणारा जेरबंद; दोन जिवंत काडतुसांसह एक मॅगझीन हस्तगत
दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक महेश तवले, बाळासाहेब पवार, तसेच प्रकाश भागानगरे, मयूर बांगरे, दत्ता गाडळकर, अजिंक्य बोरकर, निखिल वारे, संभाजी पवार, सागर गुंजाळ, अभिजीत काळे, जॉय लोखंडे, रवी दंडी, दीपक खेडकर, ऋषिकेश ताठे, सुमित लोंढे, सुरज कोतकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, महावितरणच्या नाशिक झोनचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे तसेच अहिल्यानगर महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार पवार उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शहरातील धोकादायक अवस्थेतील वीज खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा आणि प्रलंबित तक्रारींची तातडीने दखल घेऊन सर्वत्र सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की,(Little girl dies of electric shock)
“या निष्पाप चिमुरडीचा मृत्यू हा महावितरणच्या कथित हलगर्जीपणाचा परिणाम आहे. संबंधित कुटुंबीयांनी वारंवार महावितरण कार्यालयाकडे तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही. वेळेत दखल घेतली असती, तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती. या प्रकरणातील दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे.
ते पुढे म्हणाले, “ही मुलगी आमच्या कुटुंबातीलच असल्याप्रमाणे आम्ही तिच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत. महावितरण कार्यालय नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा धोकादायक अवस्थेत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार तातडीने थांबवले पाहिजेत.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की, “महावितरण कार्यालयाचे कामकाज आता ठेकेदारांच्या भरोशावर चालत असल्याचे चित्र आहे. संबंधित कुटुंबीयांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्याच निष्काळजीपणामुळे एका निष्पाप बालिकेचा जीव गेला. जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
घटनेपूर्वीच दिली होती धोक्याची लेखी सूचना- आनंदनगर परिसरातील नागरिकांनी ता. २१ ऑगस्ट २०२५ रोजी महावितरण कार्यालयाकडे संबंधित विजेच्या खांबाबाबत लेखी तक्रार केली होती. या निवेदनामध्ये संबंधित इलेक्ट्रिक पोल अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तातडीने नवीन पोल बसविण्यात यावा, अन्यथा कधीही दुर्दैवी घटना घडू शकते, अशी स्पष्ट पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, या निवेदनाची दखल न घेतल्यामुळेच एका निष्पाप बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.


