Maharashtra bandh: भिंगार बंद यशस्वी! वंचित बहुजन आघाडीने मेलोडी चॉकलेट वाटून केली केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्र बंदच्या हाकेला संपुर्ण प्रतिसाद

0

Maharashtra bandh अहिल्यानगर: दिल्लीतील जंतरमंतर (Jantar mantar) येथे शांततेत सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलकांवर (CJP Protesters) पोलिसांनी लाठाचार्ज केला, त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (23 जुले) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदच्या हाकेला अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरालगतच्या भिंगार (Bhingar) उपनगरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. येथील संपुर्ण बाजरपेठ बंद ठेवून येथील व्यापाऱ्यांनी या बंदला पाठींबा दिला आहे. तसेच यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ नागरिकांना चक्क मेलोडी चॉकलेट वाटले. काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) इटलीची पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Meloni) यांना मेलोडी चॉकलेट दिले होते. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच घटनेचा संदर्भ घेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपहासात्मकरित्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटले. त्यामुळे या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा झाली.

नक्की वाचा : जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

हा विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न (Maharashtra bandh)

तसेच महाराष्ट्र बंद या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरेधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलनादरम्यान जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि जिल्हा सल्लागार सुहास धीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठीच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भिंगारमधील हा बंद शांततेत पार पडत असून व्यापारी आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे आंदोलनाला बळ मिळाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.