MIDC : नगर : जिल्ह्यातील बेलवंडी (ता. श्रीगोंदे) येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी (MIDC) उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. आज मुंबई येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला आहे. या एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात-लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे कालमर्यादेत करण्यात यावीत, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
हे देखील वाचा: केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल’- राहुल गांधी
खासदार सुजय विखे आणि आमदार बबनराव पाचपुते यांचा पाठपुरावा (MIDC)
एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार आहे. तत्काळ हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. श्रीगोंदे तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील ६१८ एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता. उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले.
नक्की वाचा : राजूरमध्ये आजी-माजी आमदारांचे ठिय्या आंदोलन
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार (MIDC)
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, ”बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतूक सुविधा उपलब्ध तर आहेच, शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसीमुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहाता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्गमधुन भोगवटादार वर्ग १ करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. या बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अपर सचिव राजगोपाल देवरा, नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.