Milk Adulteration : नगर : अन्न व औषध प्रशासनाच्या (Food and Drug Administration) तपासणी मोहिमेअंतर्गत केडगाव परिसरातील शितल मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्स आणि झकास वडापाव सेंटरवर कारवाई करण्यात आली. शितल मिल्कमधील भेसळीचा (Milk Adulteration) संशय असलेले ५५६ दूध पॅकेट जप्त करून नष्ट करण्यात आले, तर आवश्यक परवाना नसल्याने झकास वडापाव सेंटरचे उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
नक्की वाचा : नेवाशात माऊलींच्या मंदिरामागे वाळू चोरी, पोलिसांच्या छाप्यात एकाला अटक
राज्यभर अन्नपदार्थांची तपासणी मोहीम
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या आदेशानुसार राज्यभर अन्नपदार्थांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सहायक आयुक्त गौरव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे आणि साजिदा मुल्ला यांनी केडगाव येथील शितल मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्स येथे तपासणी केली. या ठिकाणी दूध संकलन करून त्याचे पिशव्यांमध्ये पॅकिंग करून विक्री केली जात असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना दूधाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने १५ हजार ५६८ रूपये किमतीच्या ५५६ दूधाच्या बॅग जप्त करण्यात आल्या. संबंधित दूधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला, अशी माहिती सहायक आयुक्त गौरव जगताप यांनी दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संबंधित उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेश (Milk Adulteration)
दरम्यान, केडगाव येथील झकास वडापाव सेंटरच्या उत्पादन केंद्राचीही तपासणी करण्यात आली. वडापाव तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार केला जात असलेल्या ठिकाणी आवश्यक अन्न परवाना नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.



