
MLC Election : नगर : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत नाट्यमयरित्या माघार घेतलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रेय पानसरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेत राजकीय दबाव, बनावट सही आणि जबरदस्तीचा आरोप जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी दादासाहेब गीते यांच्यावर केला आहे.
हेही वाचा : दत्तात्रय पानसरे यांनी माघारीतून काय मिळविले
पानसरे यांनी ‘I❤️नगर’शी बोलताना सांगितले की, निवडणूक कार्यक्रमानुसार ४ जून २०२६ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला नव्हता. कोणत्याही सूचकाला प्राधिकृत केले नव्हते किंवा सही केली नव्हती. तरीही राजकीय दबावाखाली बनावट सही करून त्यांचा अर्ज मागे घेतल्याचे दाखवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
पानसरे यांचे नेमके म्हणणे काय?
पानसरे यांच्या म्हणण्यानुसार आमदार संग्राम जगताप यांच्या शब्दाला मान देऊन ते ४ जून रोजी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यानंतर वेळ संपल्यानंतर जबरदस्तीने किंवा बळजबरीने त्यांना सही करावी लागली. नगरसेवकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी मुदतीत माघार घेतलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी बनावट सहीद्वारे माझा उमेदवारी अर्जावर माघार दाखवली. हा मोठा अन्याय असल्याचे पानसरे यांनी म्हटले आहे. तसेच विधानपरिषद निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांना “राजकीय पुढाऱ्यांचे भाड्याचे दलाल” म्हणत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. तसेच कोणाचीही दादागिरी नको असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नक्की पहा : शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक
राधाकृष्ण विखे म्हणाले… (MLC Election)
पानसरे यांच्या आरोपांवर बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी असे काहीही झालेले नाही. पानसरेंचे व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेले आहे, एवढेच भाष्य केले.
पानसरेंच्या आरोपांना पणन महासंघातील ‘अविश्वासा’ची किनार? (MLC Election)
राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष असलेले दत्तात्रेय पानसरे हे विधानपरिषद निवडणूक लढविणार असल्याची कुणकुण लागताच त्यांच्यावर जाणीवपूर्वक अविश्वास दाखल करून दबाव आणल्याची चर्चा होती. पानसरे यांनी माघार घेण्यासाठी पणनचे अध्यक्षपद कायम करण्याचा शब्द देण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होताच पणन महासंघातील अध्यक्षपदावर पानसरे यांच्यावर अविश्वास आणण्यात आला. त्यामुळे दुखावलेल्या पानसरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात शड्डू ठोकल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.


