नगर : राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व (Monsoon Updates)पावसाने जोरदार एन्ट्री केल्याचं चित्र आपण सगळ्यांनी पाहिले आहे. कोपरगाव (Kopargaon)आणि नेवासा (Newasa) तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, राहुरी परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. कडक उन्हाच्या झळांनंतर वातावरणात गारवा आला असला तरी, या वादळी पावसाचा तडाखा पिकांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ
कोपरगाव तालुक्यात काय परिस्थिती? (Monsoon Updates)
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली. पोहेगाव, रांजणगाव देशमुख तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत सापडले आहेत. अचानक आलेल्या ढगाळ वातावरणानंतर जोरदार वारे सुरू झाले. त्यानंतर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर वीजपुरवठाही खंडित झाला होता. अवकाळी पावसाचा विशेषतः कांदा,भाजीपाला व फळबागांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजले आहेत. आधीच कांद्याला भाव नाही त्यात पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
अवश्य वाचा: भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचे कारण काय?
नेवाश्यात वादळी वाऱ्याने नुकसान (Monsoon Updates)
नेवाश्यात वादळी वाऱ्याने नुकसान नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडे असणाऱ्या पाचेगाव, बेलपिंपळगाव, पुनतगाव, खुपटी व निंभारी या परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली, पण याबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. झाडे पडल्याने दळणवळणाचे रस्ते काहीकाळ बंद झाले होते. निंभारी येथील नारायण जाधव यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर लिंबाचे झाड पडल्याने ट्रॅक्टरचे मोठं नुकसान झालं. तर खुपटी व पाचेगाव गणाचे माजी पंचायत समिती सदस्य विक्रम साहेबराव चौधरी यांच्या बंगल्यासमोर लावलेल्या गाडीवर झाड पडल्याने चौधरी यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तसेच एक पत्र्याची टपरी देखील या वाऱ्यात उडून गेल्याची माहिती मिळाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील वीज खंडित झाली होती. असचं काहीसं चित्र राहुरी तालुक्यातही पाहायला मिळाले आहे.
राहुरी शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी आंबा व जांभूळ पिकांचे नुकसान झालय, तर काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला होता.
शुक्रवारी सकाळपासूनच राहुरी शहर व परिसरात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. राहुरी शहरासह ग्रामीण भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. मान्सूनपुर्व पावसामुळे पुढील काही दिवसांतही वातावरणात बदल राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



