Nagar-Manmad Highway : नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आता एक झेंडा निषेधाचा आंदोलन

अनेकांच्या हाती निषेधाचा काळा झेंडा

0
Nagar-Manmad Highway : नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आता एक झेंडा निषेधाचा आंदोलन
Nagar-Manmad Highway : नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आता एक झेंडा निषेधाचा आंदोलन

Nagar-Manmad Highway : राहुरी : नगर-मनमाड महामार्गाच्या (Nagar-Manmad Highway) दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियातून (Social media) अनोखे आंदोलन (Movement) उभे राहिले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमार्फत पंढरपूरच्या विठोबाला साकडे घालण्यात आले.”बा पांडुरंगा आमचा महामार्ग आता तरी चांगला होऊ दे.” या आशयाचे फलक राहुरीत वेगवेगळ्या ठिकाणी या महामार्गाच्या लगत दुतर्फा लावण्यात आले होते .त्यानंतर एक झेंडा निषेधाचा हे आंदोलन सोशल माध्यमातून उभे राहिले आहे.

नक्की वाचा : केंद्र शासनाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील ४८ गावांचा समावेश

हा ग्रूप १९९५ पासून कार्यरत

15 ऑगस्ट पर्यंत नागरिकांना संबंधित विभाग,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार यांच्या निषेधार्थ आपल्या वाहनावर, आपल्या घरावर, आपल्या व्यावसायिक संकुलावर एक काळा झेंडा लावून  या सर्वांचा तीव्र निषेध केला जावा असे आवाहन समितीने केले आहे. अत्यंत शांततेच्या मार्गाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याचे या कृती समितीचे अध्यक्ष  देवेंद्र लांबे, नगरसेवक वसंत कदम, नवनीत दरक यांनी सांगितले. “लढा आहिल्यानगर मनमाड रोडसाठी ” या सोशल मिडीयावर ग्रुपद्वारे जनजागृती केली जात आहे. एक हजार पेक्षाही अधिक सदस्य असलेला हा ग्रूप १९९५ पासून कार्यरत आहे. अनेकदा या ग्रूपमधील सदस्यांनी संबंधित यंत्रणांना जाग येण्यासाठी निवेदने दिली. रास्तारोको आंदोलने केली. या विषयावर झालेल्या वेगवेगळ्या बैठकीत सातत्याने आवाज उठवला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अनेकांच्या हाती निषेधाचा काळा झेंडा (Nagar-Manmad Highway)

अधिकारी, यंत्रणांना धारेवर धरले.आता अनेकांनी निषेधाचा काळा झेंडा हाती घेतला आहे. काहींनी तो स्टेटसवर ठेवला आहे. या महामार्गावर झालेल्या कामापोटी आत्तापर्यंत दीडशे कोटी रुपये या ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. मात्र एकाच पावसात हा रस्ता पुन्हा पूर्वीपेक्षाही अधिक खराब झालेला आहे. सोशल मीडियातून या रस्त्याचे काम सुरू असताना त्याच्या दर्जा विषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या जात होत्या.मात्र त्याकडे पूर्णपणे हेतूतःडोळेझाक करण्यात आली.आणि आता यंत्रणा परस्परांकडे बोट दाखवीत आहेत. गुणवत्ता नियंत्रण विभागांने काम चांगले केले नाही आणि गुणवत्ता पूर्ण काम झाले नसल्याची जाहीर कबुली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी राहुरी नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत दिली.

महामार्गावर पुन्हा डागडुजी सुरू

या संदर्भात संबंधित यंत्रणांना आम्ही अनेक नोटीसा पाठविल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले. हे सांगून त्यांनी स्वतःचे हात केवळ मोकळे करण्याचा प्रयत्न केला आहे. तर गुणवत्ता नियंत्रण कंपनीने ठेकेदाराला वेळेवर डांबर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे गुणवत्ता घसरली असे सांगितले. प्रत्यक्षात चांगला रस्ता हवा यासाठी आता काय केले पाहिजे असा मोठा प्रश्न रस्ता दुरुस्ती आंदोलन समितीला पडलेला होता.त्यातूनच एक झेंडा, एक फीत निषेधाची हे आंदोलन सुरू केले आहे. त्याला प्रतिसाद वाढतो आहे. महामार्गावर पुन्हा डागडुजी सुरू असली तरीही आम्हाला चांगला रस्ता हवा ही मागणी सातत्याने प्रशासनाकडे मांडली जात आहे.महामार्गाच्या दुरावस्थेची प्रमुख कारणे स्पष्ट करताना कृती समितीच्या वतीने सांगितले गेलेली कारणे या प्रमाणे आहेत.

कृती समितीच्या वतीने सांगितले गेलेली कारणे

अतिप्रचंड वाहतूक: हा महामार्ग दक्षिण भारताला थेट उत्तर भारताशी (इंदूर, गुजरात, राजस्थान) जोडणारा  एकमेव महामार्ग आहे. त्यामुळे यावरून २४ तास अवजड ट्रक आणि कंटेनर्सची मोठी वाहतूक चालते, ज्याचा ताण रस्त्यावर पडतो. सन 1995 ला  जेव्हा प्रकाश कन्स्ट्रक्शन कंपनीने या रस्ता दुपदरी करण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी आगामी 25 वर्षाची वाहतूक वाढ गृहीत धरून या रस्त्याचे डिझाईन केले होते. मात्र प्रत्यक्षामध्ये ट्रॅफिक इन्सेंटिटी वाहतूक घनता एवढी मोठी आहे की 25 वर्षातील वाहतुकीची वाढ प्रत्यक्षामध्ये पंधरा वर्षातच त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक वाढ झाली आहे.सर्वाधिक माल वाहतूक या महामार्गावर आहे.

धार्मिक पर्यटनाचा ताण: शिर्डी (साईबाबा मंदिर) आणि शनी-शिंगणापूर या आंतरराष्ट्रीय देवस्थानांमुळे दररोज हजारो व्हीआयपी आणि भाविकांच्या वाहनांची वर्दळ या मार्गावर असते.

ठेकेदारांची बेफिकीर आणि संथ काम: महामार्गाच्या कॉंक्रिटीकरण आणि रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. जुने खड्डे नीट न भरता काम पुढे ढकलले जात आहे.

प्रशासकीय अनास्था व निधीचे वाद: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हस्तांतरण झाल्यानंतरही काम वेळेत पूर्ण करण्यासाठी स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांच्यात योग्य समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. मुख्य ठेकेदारांनी अनेक सब ठेकेदारांना ही कामे तोडून दिली आहेत. या वेगवेगळ्या ठेकेदारांच्या कामात काहीच समन्वय नाही. सर्व ठेकेदारांना महामार्ग कामे करण्याचा अनूभव, यंत्रसामुग्री ही त्यांच्या कडे नाहीत. निधीच्या भ्रष्टाचाराचे आरोपही या कामावर झाले आहेत.पावसाळा आणि पाण्याचा निचरा न होणे: पावसाळ्यात सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे डांबरी रस्ता उखडला जातो. 

पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारांची व्यवस्था नाही: रस्त्याच्या कडेला पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारांची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावरच साठून मोठे खड्डे तयार होतात. हे कारण दूर करण्यासाठी साईड गटारी या हद्द संपताना असायला हव्या होत्या .प्रत्यक्षामध्ये दोन्ही बाजूंना चार-चार मीटरचा हद्द सोडून देऊन रस्ता अरुंद करण्यात आलेला आहे. या साईड गटारीचे डिझाईन ,त्याचा निकृष्ट दर्जा यामुळे पावसाचे पाणी या साईट गटारी वरून वाहून जाणार नाही तर रस्त्यावरच ते साचून राहणार आहे .

त्यामुळे गुणवत्ता आणखीनच वेगाने खराब होणार आहे .सदोष डिझाईन व निकृष्ट काम यामुळे प्रश्न आणखी गंभीर बनलेले आहेत.महामार्गाची उंची चार ते पाच फूटांनी वाढलेली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाणार नाही. अनेक भागात हे पाणी मोठ्या प्रमाणात साचणार आहे.

अतिक्रमणे आणि चुकीचे नियोजन: महामार्गाच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये (उदा. राहुरी, कोपरगाव) मोठ्या प्रमाणावर झालेली अतिक्रमणे रस्त्याच्या रुंदीकरणात आणि वाहतूक व्यवस्थापनात अडथळा ठरत आहेत. महामार्गालगची अतिक्रमणे पूर्णपणे हटविली जावेत अशा स्वरूपाचे आदेश सर्वोच्च न्यायालयांना दिलेले आहेत. सर्व राज्य सरकारांनी या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे .दोन महिन्याच्या आत महामार्गावरील  सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविली  जाणार का या निर्णयाच्या अंमलबजावणीची आता लोकांना प्रतीक्षा आहे.

दोन वर्षांपूर्वी महामार्गावरील सर्व अतिक्रमणे हटविली गेली होती. मात्र ती परत होणार नाहीत याची कोणतीही खबरदारी घेतली नाही. परिणामी अतिक्रमणे पूर्ववत वाढली आहेत.महामार्गाच्या दुरुस्तीचे डिझाईन सदोष आहेत असंख्य त्रुटी असल्याने  अपघाताचे प्रमाण वाढणार आहे अरुंद रस्त्याने वाहतूक असुरक्षित होणार आहे बसवेची व्यवस्था नाही.