Nilesh Lanke: श्रीगोंदा: “मी पळ काढणारा नाही, तर भिडणारा कार्यकर्ता आहे. विधानसभा लढवण्याचं विधान ही केवळ विरोधकांचा अंदाज घेण्यासाठी टाकलेली राजकीय ‘गुगली’ होती. २०२९ ला मी पुन्हा लोकसभेच्याच मैदानात दंड थोपटून उभा असेल,” अशा शब्दांत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. श्रीगोंदा येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी २०२९ च्या रणधुमाळीचे रणशिंग आत्तापासूनच फुंकले. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, प्रा. संजय लाकुडझोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अवश्य वाचा- पाईपलाईन रोड परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
माझा जनसंपर्क हीच माझी शक्ती (Nilesh Lanke)
खासदार निलेश लंके म्हणाले, “आमची सत्ता नसल्याने कामात अडथळे आणले जात आहेत, पण मी दक्षिण नगर जिल्ह्याचा संपर्क तुटू दिलेला नाही. जनतेची कामं करण्यासाठी मला सत्तेची गरज नाही, माझा जनसंपर्क हीच माझी शक्ती आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. पुढे बोलताना त्यांनी जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावरही राज्य सरकारला धारेवर धरले. डिंबे-माणिकडोह शिवाय पर्याय नसून “कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा असेल, तर डिंबे-माणिकडोह योजना पूर्ण झालीच पाहिजे. ही आमची ‘लाईफलाईन’ आहे,” असे ते म्हणाले. साकळाईवर रोखठोक बोलताना खासदार लंके यांनी साकळाई योजना झालीच पाहिजे, पण ती करताना कोणाच्या तोंडचे पाणी पळवून दुसऱ्यावर अन्याय होता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला. घोड धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी भविष्यात भीमेचे पाणी तिथे आणावेच लागेल, या तांत्रिक बाजूकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, लवकरच एक मोठे शिष्टमंडळ घेऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी यावर आता केवळ आश्वासन न देता ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही खासदार लंके यांनी केली.



