Pathardi News : बाप म्हणजे बाप असतो,पहिले कन्यादान आता किडनीदान; पाथर्डीत वडिलांनी मुलीला दिले नवजीवन

0
Pathardi News : बाप म्हणजे बाप असतो,पहिले कन्यादान आता किडनीदान; पाथर्डीत वडिलांनी मुलीला दिले नवजीवन
Pathardi News : बाप म्हणजे बाप असतो,पहिले कन्यादान आता किडनीदान; पाथर्डीत वडिलांनी मुलीला दिले नवजीवन

पाथर्डी : “जो बिना आंसू और बिना आवाज के रोता है, वो बाप होता है, वो बच्चों की किस्मत के छेद को अपनी बनियान में पहन लेता है, वो बाप होता है, या उक्तीची प्रचिती देणारी हृदयस्पर्शी  घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील (Pathardi News) दुलेचांदगाव येथील रहिवासी असलेले आणि आदिनाथनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक चंद्रकांत भगवान पाचरणे यांनी आपल्या मुलीचे आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान (Kidney Donation) करून तिला नवीन जीवन दिले आहे.

नक्की वाचा : विद्यार्थ्यांना दिलासा; व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार

नेमकं काय घडलं? (Pathardi News)

चंद्रकांत पाचरने यांची मुलगी निकिता वाकचौरे या गेल्या काही काळापासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना तातडीने किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर योग्य किडनी देणाऱ्याचा शोध सुरू झाला. अशातच निकिताचे वडील चंद्रकांत पाचरणे यांनी कोणतीही तमा न बाळगता स्वतःची किडनी मुलीसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आवश्यक असलेल्या वैद्यकीय तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर किडनी प्रत्यारोपणासाठी सर्व बाबी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले.

छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रदीप सारूक यांच्या मार्गदर्शनाखाली ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. विशेष म्हणजे अवघ्या ५६ दिवसांत सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून हे प्रत्यारोपण करण्यात आले, ही बाब वैद्यकीयदृष्ट्याही उल्लेखनीय मानली जात आहे. सध्या किडनी देणारे वडील चंद्रकांत पाचरणे आणि किडनी मिळालेली त्यांची मुलगी निकिता वाकचौरे या दोघांचीही प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती मिळाली आहे. 

अवश्य वाचा : निलेश लंके शरद पवारांची साथ सोडणार का? शिंदे गटात प्रवेशाची चर्चा का?

किडनी दान करून वडिलांनी ठेवला आदर्श  (Pathardi News)

ज्या वडिलांनी विवाहाच्या वेळी कन्यादान करून मुलीच्या नव्या संसारासाठी आशीर्वाद दिला, त्याच वडिलांनी आज तिच्या जीवनावर आलेले संकट दूर करण्यासाठी स्वतःची किडनी दान करून पितृत्वाचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असून अनेकांसाठी ही घटना प्रेरणादायी ठरत आहे.

या संपूर्ण कालावधीत आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान, आदिनाथनगर येथील सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मित्रपरिवार यांनी पाचरणे कुटुंबाला मानसिक आधार व सहकार्य केले. तसेच शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे आणि राहुल राजळे यांनी वेळोवेळी धीर देत आवश्यक सहकार्य केल्याबद्दल पाचरणे कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. या घटनेनंतर चंद्रकांत पाचरणे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून नातेवाईक, ग्रामस्थ, सहकारी शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.