Pravin Korgantiwar : नगर : तृतीयपंथी व्यक्तींच्या (Transgender Person) सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे (Social Welfare Department) सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार (Pravin Korgantiwar) यांनी केले.
जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयाेजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथी व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेश उगले, लैला गुरु नगरवाले, दिशा पिंकी शेख, किरण नेटके, चंद्रकांत काळोखे, ॲड. अनुराधा येवले, डॉ. विक्रम पानसंबळ, शिवाजी जाधव, दिलावर शेख तसेच मोठ्या संख्येने तृतीयपंथी व्यक्ती उपस्थित होत्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील (Pravin Korgantiwar)
सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार म्हणाले की, तृतीयपंथी व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक, शैक्षणिक, स्वयंरोजगार आणि सामाजिक सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन ‘बीज भांडवल योजनेसह’ शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शासनाचे सर्व विभाग समन्वयाने कार्यरत असून, या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेश उगले यांनी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. ॲड. अनुराधा येवले यांनी तृतीयपंथी व्यक्तींच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध मोफत कायदेशीर सहाय्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
दिशा पिंकी शेख यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, तृतीयपंथी प्रमाणपत्र आणि ओळखपत्रश यांसारखी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असण्याचे महत्त्व स्पष्ट केले. वरिष्ठ वैद्यकीश अधिकारी डॉ. विक् पानसंबळ यांनी आरोग्य, मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी दिवंगत काजल गुरु नगरवाले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यशाळेत तृतीयपंथी व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना, आयुष्मान भारत योजना आणि बीज भांडवल योजना यांसाठी अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय तृतीयपंथी तक्रार निवारण समितीच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाणी शिंगवी यांनी केले, तर आभार समाजकल्याण निरीक्षक संगिता चितळे यांनी मानले.



