Rain accompanied by gusty winds : अहिल्यानगर जिल्ह्यात ३ व ४ जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’

Rain accompanied by gusty winds

0
Rain accompanied by gusty winds : अहिल्यानगर जिल्ह्यात ३ व ४ जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा 'येलो अलर्ट'
Rain accompanied by gusty winds : अहिल्यानगर जिल्ह्यात ३ व ४ जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा 'येलो अलर्ट'

नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Rain accompanied by gusty winds : नगरभारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात ३ आणि ४ जुलै २०२६ रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच वादळी वारे (Rain accompanied by gusty winds) वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) देण्यात आला असून, संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिते यांनी केले आहे.

मेघगर्जना, विजांचा कडकडाट किंवा वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली अथवा मोकळ्या मैदानात थांबू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. टॉवर, ध्वजस्तंभ, विजेचे खांब, विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर), धातूचे कुंपण तसेच लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे. वीजवाहक वस्तूंना स्पर्श करणे टाळावे. मेघगर्जना सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास उकिडवे बसून हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील याची काळजी घ्यावी. वादळी वाऱ्यामुळे झाडे किंवा जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच ट्रॅक्टर उलटणे किंवा शेतीची अवजारे हाताळताना अपघात होणार नाहीत, यासाठी विशेष सतर्कता बाळगावी.

वादळी वारे, पाऊस किंवा गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या अथवा आणण्याचे नियोजन केलेल्या शेतीमालाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जनावरेही सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

धरण, नदी किंवा कालव्याच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण, नदी किंवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढणे टाळावे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मदतीसाठी जवळच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व ०२४१-२३५६९४०, तसेच ११२ आणि १०७७ या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.