
Rajendra Gadge : संगमनेर : अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) याला अखेर न्यायालयाने (Court) काही अटी व शर्थींवर जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. तब्बल ४२ दिवसांनंतर गडगे याला जामीन मिळाल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, तपास अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप फिर्यादींकडून करण्यात येत असून, पुढील काही दिवसांत त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वााचा : साकूर-टेकडवाडीचा पूल बनला धोकादायक; तातडीने संरक्षण कठडे बसविण्याची मागणी
आरोप लागू होत नसल्याचा दावा
या प्रकरणात आरोपीचे वकील ॲड. श्रीप्रसाद कानडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, गडगे याच्यावर करण्यात आलेले आरोप लागू होत नसल्याचा दावा केला. दैवी शक्तीने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करण्यात आलेला नसून, दत्तधाम सरकारमध्ये भाविक मानसिक शांततेसाठी येतात, असे त्यांनी सांगितले. येथे कोणताही जादूटोणा होत नसून ध्यानधारणा केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
समोर आलेला व्हिडीओ अर्धवट (Rajendra Gadge)
दत्तधाम ही नोंदणीकृत संस्था असून, उपचारासाठी आयुर्वेदिक डॉक्टर नेमण्यात आल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली. कॅन्सरसारखे आजार बरे करण्याचा जो व्हिडीओ समोर आला आहे तो अर्धवट असल्याचा दावा बचाव पक्षाने केला. तर या प्रकरणात मुख्य युक्तिवाद करण्यासाठी राजेंद्र गडगे यांच्या वतीने वरिष्ठ विधीज्ञ ॲड. सुनिता बन्सल, ॲड. श्रीप्रसाद कानडे, ॲड. मंगेश टेकाडे आणि ॲड. नितीश चोरमले यांनी काम पाहिले. तसेच ॲड. संपत पवार आणि ॲड. स्वाती सांगळे यांनी त्यांना कायदेशीर सहकार्य केले.
अपूर्ण तपासात जामीन मिळणे ही गंभीर बाब
दरम्यान, फिर्यादी ॲड. रंजना गवांदे यांनी जामिनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यानंतर तपासाची गती मंदावली असून, अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ९० औषधांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. बनावट व्हिडीओ प्रकरणाचाही अहवाल प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे डॉ. मोहन पुरी अद्याप फरार असून, राजेंद्र गडगे याच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास होणे आवश्यक असल्याचे गवांदे यांनी म्हटले आहे. अपूर्ण तपासात जामीन मिळणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
गुन्ह्यात आणखी आरोपी समाविष्ट करण्याची मागणी
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनीही पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा सामाजिक स्वरूपाचा गुन्हा असून पोलिस तपास अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या गुन्ह्यात आणखी आरोपी समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. तपासी अधिकारी प्रवीण साळुंखे यांना पुरवणी जबाब घेण्याचे आदेश देण्यात आले असले तरी अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला.


