Ravindra Chavan : नगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजय संकल्प सभा उत्साहात संपन्न झाली. सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, तर त्यांचे स्वागतच आहे. पुढे ते म्हणाले की, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवावे. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल.
हेही वाचा : LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर
काय म्हणाले चव्हाण? (Ravindra Chavan)
रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर अक्षय कर्डिले यांना विजयी करणे आवश्यक आहे. पक्षाशी नाळ जोडलेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी. ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुळा धरणाची उंची वाढविणे व गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच या भागातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतील. अक्षय कर्डिले हे युवा नेतृत्व असून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
नक्की पहा : अखेर न्याय मिळाला! कोपरगावात पत्नीची हातोड्याने हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप
सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, ही निवडणूक सार्वत्रिक नसून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे लागलेली पोटनिवडणूक आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न भरता पाठिंबा दिला आहे, आता त्यांनी अधिकृत पाठिंबा द्यावा. ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय कर्डिले यांनी सामान्य जनतेचा आवाज बनून काम केले. पाणी, विकास आणि सामाजिक प्रश्न सोडविण्याची जबाबदारी शासन पार पाडत आहे. पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे.
यांची उपस्थिती (Ravindra Chavan)
या सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार विक्रम पाचपुते, महामंत्री विजय चौधरी, रवींद्र अनासपुरे, केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सत्यजित कदम आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुख उपस्थित होते. एकूणच, या विजय संकल्प सभेमुळे राहुरी मतदारसंघात भाजप महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारी भोवती जनसमर्थन अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.



