Rifle Theft : मयत माजी सैनिकाच्या नावावरील रायफल चोरीला; पाथर्डी शहरातील घटना

0
Rifle Theft : मयत माजी सैनिकांच्या नावावरील रायफल चोरीला; पाथर्डी शहरातील घटना
Rifle Theft : मयत माजी सैनिकांच्या नावावरील रायफल चोरीला; पाथर्डी शहरातील घटना

Rifle Theft : पाथर्डी : शहरालगत असलेल्या शिक्षक कॉलनी परिसरात बंद घर फोडून माजी सैनिकांच्या नावावरील डबल बोर रायफल, जिवंत काडतुसे, चिल्लर रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून बारकाईने तपास केला जात आहे.

नक्की वाचा : गावठी कट्टे बाळगणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; कर्जत पोलिसांची कारवाई 

नेमकं काय घडलं?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय जगन्नाथ शिरसाठ (वय २७, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिरसाठ हे शिक्षणासाठी अहिल्यानगर येथे ये-जा करीत असून त्यांच्या आई शेतीच्या कामानिमित्त टेंभुर्णी (ता. आष्टी, जि. बीड) येथे जात असतात. फिर्यादीनुसार अक्षय शिरसाठ यांनी दि. १० मे रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून अहिल्यानगर येथे गेले होते. त्यानंतर दि. १७ मे रोजी रात्री साडेदहा वाजता घरी परत आल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.घराची पाहणी केली असता सोफ्यामध्ये ठेवलेली डबल बोर रायफल, ४० जिवंत राऊंड, चिल्लर रक्कम तसेच रायफल परवाना व इतर कागदपत्रे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या साहित्याची अंदाजे किंमत १८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही पहा : अहिल्यानगर महापालिकेमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा

मयत होऊनही रायफलचा ताबा (Rifle Theft)

विशेष म्हणजे, चोरीस गेलेली रायफल ही माजी सैनिक जगन्नाथ रघुनाथ शिरसाठ यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. जगन्नाथ शिरसाठ यांचे सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर संबंधित रायफल व जिवंत काडतुसे संधीत विभागाकडे जमा करण्यात आली नव्हती का, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

माजी सैनिकांच्या नावावरील परवानाधारक रायफल संबंधित माजी सैनिकाच्या निधनानंतर वारसदाराने ती विनापरवाना स्वतःकडे ठेवू नये. कायद्यानुसार ती तात्पुरती अधिकृत ठिकाणी जमा करणे आवश्यक असते.जर वारसदाराला रायफल स्वतःच्या नावावर घ्यायची असेल, तर नवीन किंवा हस्तांतरण परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. मंजुरी मिळेपर्यंत शस्त्र पोलीसांकडे किंवा अधिकृत शस्त्रागारात ठेवावे लागते.पाथर्डी पोलिस या घटनेचा पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव हे अधिक तपास करीत आहेत.