Robbery : श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव येथील एका वृद्ध दाम्पत्याला लाकडी काठी व तलवारीने बेदम मारहाण (Assault) करून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची (Robbery) धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्याचा श्रीगोंदा पोलिसांनी (Shrigonda Police) अवघ्या ६ तासांत छडा लावला असून, मुख्य आरोपीसह त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत शेडगावच्या स्थानिक नागरिकांकडून पोलीस पथकाला मोलाची मदत करण्यात आली.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लाकडी काठी आणि तलवारीने मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिराबाई ज्ञानदेव केदारी (वय ७५ वर्षे, रा. रसाळ मळा, शेडगाव, ता. श्रीगोंदा) यांनी रविवारी (ता. १७) रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार १६ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हिराबाईंचे पती ज्ञानदेव केदारी हे घराच्या पडवीत झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी तिथे प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला लाकडी काठी आणि तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार (Robbery)
त्यानंतर खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार झाले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना समजताच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती देऊन घटनास्थळाला भेट दिली. जखमी व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या पक्क्या बातमीच्या आधारे, हा गुन्हा आरोपी राजा सायट्या पवार याने त्याच्या अल्पवयीन मुलासह केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींना ऊसाच्या फडातून घेतले ताब्यात
आरोपी शेडगाव परिसरातील एका ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलीस पथकाने तब्बल ६ तास संपूर्ण ऊसाचे क्षेत्र पिंजून काढले आणि दोन्ही आरोपींना ऊसाच्या फडातून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्में, आणि कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस पथकाने केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे करत आहेत.



