Shirdi Crime : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार

0
Shirdi Crime : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार
Shirdi Crime : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार

नगर :  ‘साईबाबांची पावन नगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना (Shirdi Crime) समोर आली आहे. शिर्डीमध्ये महिलेवर चाकूने वार (Woman Stabbed) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. साई मंदिर परिसरात हा रक्तरंजित थरार घडला. या घटनेमुळे मंदिर परिसरात गोंधळ उडाला होता. आता नेमकं काय घडलं ते पाहू …

नक्की वाचा : धर्मांतरानंतर अनुसूचित जातीचे लाभ मिळतील की नाही? सरकार घेणार मोठा निर्णय

नेमकं काय घडलं? (Shirdi Crime)

शिर्डीतील साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ जवळ काल रविवारी (ता.१९) रात्री १० वाजण्याच्या सुमारास काकडी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या जयश्री क्षीरसागर या महिलेवर १ ते २ अज्ञात मुलींनी चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जयश्री क्षीरसागर गंभीर जखमी झाल्या असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. जयश्री क्षीरसागर या नेहमीप्रमाणे साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ जवळ काकडी विक्रीच्या व्यवसायात व्यस्त होत्या. याच दरम्यान अचानक आलेल्या १ ते २ मुलींनी त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की त्यांच्या छातीवर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जयश्री क्षीरसागर यांना साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती जखमी महिलेचे पती साईनाथ भालचंद्र क्षीरसागर यांनी दिली.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे रुग्ण, आंध्रात चौघांचा मृत्यू; कुठे किती रुग्ण?

हल्ला नेमका कोणत्या कारणातून?  (Shirdi Crime)

याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जखमी महिलेचे पती साईनाथ क्षीरसागर यांनी सांगितले, “आमचे कोणाशीही वैर नाही, कोणताही वाद नाही. माझी पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून शांततेत येथे व्यवसाय करत आहे. तरीही तिच्यावर अशा पद्धतीने जीवघेणा हल्ला करण्यात आला.” यावेळी साईनाथ यांनी संतप्त भावना व्यक्त करत, “महिला जर अशा प्रकारे चाकू घेऊन मुक्तपणे फिरत असतील आणि साई मंदिरासारख्या अतिसंवेदनशील व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात अशा घटना घडत असतील तर शिर्डी खरोखर सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित केला.

साईनाथ क्षीरसागर हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर जयश्री या आपल्या व्यवसायातून घराला आर्थिक हातभार लावत होत्या. या दाम्पत्याला दोन लहान मुले असून, पत्नी सध्या जीवन-मरणाशी झुंज देत असल्याने मुलांचा सांभाळ कसा करायचा? असा गंभीर प्रश्न आता या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. भाविकांनी कायम गजबजलेल्या आणि देश-विदेशातील लाखो श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान असलेल्या साई मंदिर परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिर्डी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच हल्लेखोर मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. जखमी जयश्री क्षीरसागर शुद्धीवर आल्यानंतरच या हल्ल्यामागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता असून, या घटनेकडे संपूर्ण शिर्डीचे लक्ष लागले आहे.