
नगर: “साईंच्या दरबारात श्रद्धा आणि सबुरी लागते, पण इथल्या काही लोकांसाठी फक्त ‘पैसा’ महत्त्वाचा झालाय का?” असा प्रश्न उपस्थित होतोय, श्रद्धेपोटी आपण देवाच्या चरणी फुलं-हार अर्पण करतो, पण याच श्रद्धेचा फायदा घेऊन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमध्ये (Shirdi News) एका भाविकाला २०० रुपयांचा गजरा २००० रुपयांना (A Devotee Robbed) विकण्यात आलाय. आता नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊ…
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवशी १० बालविवाह रोखले; प्रकरण काय?
साईबाबांच्या पावन नगरीत भाविकांची लूट थांबण्याचे नाव घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील एका भाविकाला २०० रुपयांचा मोगर्याचा गजरा तब्बल २००० रुपयांना विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शिर्डीत येणार्या साईभक्तांच्या फसवणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटना नेमकी काय? (Shirdi News)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील भाविक जयेंद्र लाभशंकर मेहता हे साईदर्शनासाठी आले होते. द्वारकामाई परिसरात संजय देशमुख या गजरा विक्रेत्याने पहिली माळ तुमचीच जाईल, असे सांगून त्यांना भावुक करत गजरा घेण्यास भाग पाडले. सुरुवातीला किंमत न सांगता नंतर थेट दहापट म्हणजेच 2000 रुपयांची मागणी केली. पैसे देण्यासाठी विक्रेत्याने भाविकाला वारंवार फोन करून त्रास दिल्याने अखेर मेहता यांनी साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार केली. यानंतर पोलिसांनी संबंधित विक्रेत्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्यानुसार,गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या विक्रेत्यावर यापूर्वीही तक्रारी होऊनही ठोस कारवाई न झाल्याने त्याचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.
शिर्डीत प्रसादाचाही गोरखधंदा सुरूच (Shirdi News)
शिर्डीत फक्त हार फुलांच्या बाबतीतच नव्हे, तर प्रसाद आणि पेढ्यांच्या विक्रीतही मोठा गोरखधंदा सुरू असल्याचे आरोप होत आहेत. प्रसादाच्या गुणवत्तेवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने भाविकांच्या आरोग्याशी खेळ होताना दिसतोय, शिर्डीत अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुद्धा कागदोपत्रीच उरल्याचे चित्र आहे. त्यामुळे एखादा गुन्हा दाखल करून ही समस्या सुटणार नाही, तर प्रशासनाने निरंतर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. साई संस्थान, नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना भाविकांमध्ये तीव्र आहे. श्रद्धेपोटी येणार्या भक्तांची अशी लूट केल्याने शिर्डीची प्रतिमा मोठया प्रमाणावर मलीन होत आहे. त्यामुळे अशा लुटारूंवर केवळ औपचारिक कारवाई न करता कायमस्वरूपी कठोर जरब बसवावी, अशी मागणी जोर धरत आहे.


