Female Magician | महिला मांत्रिकाकडून भूतबाधा, करणी व जादूटोण्याच्या नावाखाली ३ लाखांची फसवणूक; श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार

0

Female Magician | श्रीरामपूर : जादूटोणा, भूतबाधा, अंधश्रद्धांमध्ये भांदू बाबा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत असतानाच एक महिला मांत्रिकानेही (Female Magician) आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अज्ञानाचा गैरफायदा घेत भूतबाधा, करणी व जादूटोणा काढण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूर परिसरातील एका तथाकथित मांत्रिक महिलेविरुद्ध बेलापूर येथील पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आला आहे.

हे वाचा – इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नस्थळी चोरी; दोघा संशयीतांकडून दोन लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

महिलेने पीडितेकडून सव्वा दोन लाख रुपये उकळले (Female Magician)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते देविदास देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिलेच्या घरात सतत वाद होत असल्याने काही परिचित महिलांनी तिला एका मांत्रिक महिलेची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्या महिलेने पीडितेला घरात भूतबाधा झाली असून कुणीतरी करणी केली आहे, असे सांगून विविध पूजा, होम-हवन व तंत्र-मंत्र विधी करण्यासाठी पैशांची मागणी केली. सुरुवातीला ७५ हजार रुपये घेऊन विधी करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी विविध कारणे सांगत आणखी पूजा करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. यानिमित्ताने संबंधित मांत्रिक महिलेने पीडितेकडून एकूण सव्वा दोन लाख रुपये उकळले.

नक्की वाचा: हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

जिवे ठार मारील (Female Magician)

याशिवाय, पीडितेच्या दुकानातून सुमारे १ लाख ७हजार रुपयांच्या साड्या व कपडे उधारीवर नेण्यात आले, तसेच शिलाईचे १८५० रुपयेही थकवण्यात आले. अशाप्रकारे एकूण सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पैसे परत मागितल्यावर जादूटोणा करण्याच्या धमक्या देण्यात आल्याने भीतीपोटी काही काळ गप्प बसावे लागल्याचेही तिने सांगितले. संबंधित मांत्रिक महिलेने पीडितेवर धर्मांतर करण्यासाठीही दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. धर्मांतर केल्यास सर्व समस्या दूर होतील, असे सांगून मानसिक दबाव आणण्यात आल्याचे पीडितेने तक्रार अर्जात म्हटले आहे. माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली तर जिवे ठार मारील अशी धमकी काल बुधवारी रात्री या मांत्रिक महिला व तिच्या पतीने तक्रार अर्ज देणाऱ्या महिलेस दिल्याने काल रात्रीच ही महिला फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर झाली होती. मात्र पोलिसांनी तिला फिर्याद दाखल करण्यासाठी सकाळी येण्याचा सल्ला दिल्याने आज गुरुवारी हा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बेलापूर येथील गणेश नावाच्या भोंदू बाबा विरोधात नुकतीच पोलिसांनी कारवाई करून अटक केल्यानंतर पीडितेला धैर्य आले. त्यानंतर तिने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे देविदास देसाई यांची भेट घेतली. त्यांच्या माध्यमातून अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून तक्रार अर्ज दिला आहे.

हे पहा – अहिल्यानगर जिल्हा डबल हुंडाबळीनं हादरला! नेमकं काय घडलं?

पीडित महिलेने संबंधित मांत्रिक महिलेविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे. धर्म व श्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक व जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणीही तिने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचे वास्तव समोर आले असून, अशा भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here