
Shivdurg Trekkers : नगर : अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत हरियाणा येथील संस्थापक सदस्य आज ‘पानिपत-महाराष्ट्र संपर्क अभियान’ यात्रेसाठी रवाना झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते विविध स्थळांना भेट देणार आहेत. मंगळवारी (ता.५) या सदस्यांची टीम श्रीगोंदा शहरात येत असून श्रीगोंद्यातील दिल्ली वेस व इतरही काही पानिपत वारसा स्मारकांना भेट देणार आहेत. म्हातार पिंप्री येथील सरदार जानराव वाबळे यांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत. त्यानंतर शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या सदस्यांशी भेट घेऊन संवाद होणार आहे.
नक्की वाचा : शिवदुर्ग परिवारातर्फे धर्मवीरगडावर ‘हेरिटेज वॉक’; १०१ व्या मोहिमेत वारसा संवर्धनाचा जागर
श्रीगोंदा ते पानिपत
पानिपत युद्धासाठी १७६१ साली महाराष्ट्रातून गेलेल्या परंतु नंतर कधीच माघारी न आलेल्या लाखो पानिपतवीरांनी यमुना नदीच्या काठावर मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाची सर्वोच्च सीमा गाठली. अहमदशाह अब्दालीच्या अफाट सेनेला चुकवून मराठ्यांची जी तुकडी जिवंत वाचली होती, ती तिथेच स्थायिक झाली. त्याच आपल्या पूर्वजांचे तेथील आजचे वंशज आता पुन्हा नव्याने आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. मराठी बांधवांशी असलेलं बंधुत्वाचे नाते व इतिहास दृढ करणाऱ्या या ऐतिहासिक भेटीसाठी सर्व श्रीगोंदेकर नगरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले आहे.
हेही पहा : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात
अशी आहे यात्रा (Shivdurg Trekkers)
या अभियानाची सुरुवात जळगावमधून होणार आहे. हरियाणा मधील मराठा जागृती मंच पानिपतचे संस्थापक सदस्य जळगाव, धुळे, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीगोंदा, मंचर, पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी भेटी देऊन रोड मराठ्यांचा इतिहासाच्या अनुषंगाने जनजागृती करतील. यामध्ये अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत चळवळीचे संस्थापक तथा कोअर कमिटी सदस्य मराठा राजेश कल्याण, मराठा कृषीपाल कसबरे , मराठा भागासिंग बाळदे ,मराठा सुरजीत महाले, मराठा कृष्णा कल्याण व सोबत मंचाचे राष्ट्रीय समन्वयक कोल्हापूरचे मिलिंद पाटील यांचा समावेश आहे.


