Shrigonda Crime : श्रीगोंद्यात थरार! ‘लिव्ह इन’मधील मैत्रिणीचा निर्घृण खून करून मृतदेह जाळला

0
Shrigonda Crime : श्रीगोंद्यात थरार! 'लिव्ह इन'मधील मैत्रिणीचा निर्घृण खून करून मृतदेह जाळला
Shrigonda Crime : श्रीगोंद्यात थरार! 'लिव्ह इन'मधील मैत्रिणीचा निर्घृण खून करून मृतदेह जाळला

नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात (Shrigonda Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Leave In Relationship) राहणाऱ्या एका प्रियकराने चारित्र्याच्या संशयातून १७ वर्षीय प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉड व फरशी घालून तिचा खून (Murder Case) केला. नंतर मृतदेह जंगलात नेऊन जाळला. प्रियकर व त्याच्या वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारणारी ‘ती’ नगरची चिमुरडी ‘अहिल्या’!

नेमकं घडलं काय? (Shrigonda Crime)

या घटनेत खून झालेली ही मुलगी अल्पवयीन असून मागासवर्गीय प्रवर्गातील होती. या मुलीसोबत शुभमची इन्स्टाग्रामवर १ वर्षापूर्वी ओळख झाली. मागील तीन महिन्यांपासून ती व शुभम श्रीगोंद्यातील काळकाई चौकात राहत होते. तो तिच्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्याने या मुलीला अनेकदा मारहाणही केली. एक महिन्यापूर्वी मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात शुभम व त्याच्या आई-वडिलाविरोधात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, शुभमने हे प्रकरण मिटवले. सोमवारी (दि. १५) जूनला दुपारी २ वाजता त्या दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी शुभमने मैत्रिणीच्या डोक्यात लोखंडी रॉडचा घाव घातला व फरशीने ठेचून तिचा खून केला.

अवश्य वाचा : अकोलेतील शेतकऱ्याची दीड एकरातील जांभूळ बागेतून लाखोंची कमाई

मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न  (Shrigonda Crime)

मंगळवारी (दि. १६) रात्री शुभम व त्याचे वडील सुखदेव ओव्हळ यांनी खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी वडाळी रोडवरील जंगलाची जागा निवडली. मध्यरात्रीनंतर त्यांनी गादीत मृतदेह गुंडाळून मोटारसायकलवरून जंगलात नेला आणि मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं घडल्यानंतर मंगळवारी रात्री एक वाजता शुभमने त्याच्या अहिल्यानगर येथील मित्राला व्हिडीओ कॉल करुन वडाळी रोडवरील जंगलात मृतदेह जाळल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच शुभमच्या मित्राने नगरमधील कोतवाली पोलिस स्टेशन गाठून त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. कोतवालीचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना कल्पना दिली. ठेंगे यांनी तातडीने आरोपीच्या काळकाई चौकातील घराभोवती सापळा रचून शुभम ओव्हळ व त्याचे वडील सुखदेव यांना ताब्यात घेतले.

याबाबत आता श्रीगोंदा पोलिस ठाण्यात प्रियकर शुभम ओव्हळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हळ, आई रेखा ओव्हळ यांच्यावर खुनासह पॉक्सो व अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. मृत मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांच्या तपासात या दोघांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळाला अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे, पो.नि. संजय ठेंगे यांच्या पथकाने भेट दिली.