Shrigonda Murder : नगर : चारित्र्याच्या संशयावरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लोखंडी रॉड व फरशी डोक्यात मारून निर्घृण खून केल्याची आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी, त्याचे वडील आणि आई यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पुणे – शिर्डी रेल्वे आजपासून धावणार; जाणून घ्या वेळापत्रक आणि महत्वाचे थांबे
चारित्र्याच्या संशयावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी गेल्या काही महिन्यांपासून श्रीगोंद्यातील काळकाई चौक परिसरात मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ याच्यासोबत राहत होती. त्यांच्यात वारंवार वाद होत असत. १५ जून २०२६ रोजी दुपारी राहत्या घरी चारित्र्याच्या संशयावरून आरोपी शुभम आणि पीडित मुलगी यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून रागाच्या भरात आरोपीने मुलीला लोखंडी रॉडने मारहाण केली आणि फरशीने डोक्यात प्रहार करून तिचा जागीच खून केला. त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह घरातच लपवून ठेवला आणि तो अहिल्यानगर जवळील केडगाव येथे राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे निघून गेला.
नक्की पहा : जिल्हा परिषदेच्या रेकॉर्ड रूमवर बुलडोजर; ‘पशुसंवर्धन’ची शंभर वर्षांपूर्वीची कागदपत्रे उघड्यावर
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न (Shrigonda Murder)
काल (ता.१६) सकाळी मुख्य आरोपी आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ हे श्रीगोंद्यातील घरी आले. त्यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला. १७ जूनच्या मध्यरात्री पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा मृतदेह मोटारसायकलवरून वडाळी रोडवरील जंगलात नेला. तिथे लाकडे गोळा करून आणि पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून दिला. पीडित मुलीच्या आईला पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ आणि आई रेखा ओव्हाळ यांच्यासह अन्य संशयित साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



