Devendra Fadnavis Interview : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारणारी ‘ती’ नगरची चिमुरडी ‘अहिल्या’!

0
Devendra Fadnavis Interview : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारणारी 'ती' नगरची चिमुरडी 'अहिल्या'!
Devendra Fadnavis Interview : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारणारी 'ती' नगरची चिमुरडी 'अहिल्या'!

नगर : १५ जूनला राज्यातील सर्वच शाळा सुरु (School Starts) झाल्यात. शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत झाले. प्रशासनातील अधिकारी, आमदार, खासदार यांनीही आपल्या मतदारसंघातील शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रायगड जिल्ह्यातील एका शाळेत पोहोचले होते. यावेळी चौथीतील एका विद्यार्थिनीने आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत (Devendra Fadnavis Interview) राज्यभरात कौतुकाचा विषय ठरली. विशेष म्हणजे ही चिमुरडी मूळची अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्याने नगरकरांना या ‘अहिल्या’चा अभिमान वाटत आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रात मान्सून ‘या’ दिवशी येणार;शेतकरी चिंतातुर

यशश्री नेमकी कोण? (Devendra Fadnavis Interview)

यशश्री मिठू घुले असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील मिठू घुले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील बाळेवाडी येथील रहिवासी आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने ते रायगड जिल्ह्यात स्थायिक झाले. सध्या ते टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यशश्री ही त्यांचीच कन्या. ती  रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. तर तिचा भाऊ आता इयत्ता पहिलीत दाखल झाला आहे.

अवश्य वाचा : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी गतवर्षीच्या तुलनेत कमी दान, देवस्थानच्या एकूण ठेवी किती?

“सोपे प्रश्न विचार बरं का?” (Devendra Fadnavis Interview)

ज्यावेळी मुख्यमंत्री शाळेत पोहोचले, त्यावेळी त्यांच्या स्वागताचे जबाबदारी नगरच्या याच अहिल्येवर देण्यात आली होती. तिने मुख्यमंत्र्यांचे उत्साहात स्वागत केल्याचे दिसले. त्यानंतर तिने थेट मुलाखत सुरू केली. ती समोर उभी राहताच सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोपे प्रश्न विचार हं, हे वाक्य ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र या प्रश्नाने तिचा आत्मविश्वासही वाढला. मात्र, पुढच्या काही मिनिटांत यशश्रीने विचारलेले प्रश्न पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

तिने एकामागून एक धडक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले. तुमचे नाव काय?, तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?, सामाजिक काम करताना कोणती आव्हाने आली आणि त्यावर तुम्ही कसा मार्ग काढला? तसेच आजच्या डिजिटल युगात शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करायला आवडतील? असे विविध प्रश्न यशश्रीने मुख्यमंत्र्यांना विचारले. यावर मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे देत आपल्या अनुभवांबाबत मनमोकळा संवाद तिच्याशी साधला. मात्र, या मुलाखतीचा शेवट सर्वाधिक संस्मरणीय ठरला.

यशश्रीने मुख्यमंत्र्यांना विचारलं, “तुमच्या आयुष्यातील असा कोणता अनुभव आहे, जो तुम्हाला कायम प्रेरणा देतो?” क्षणभर विचार करून मुख्यमंत्री हसले आणि म्हणाले, “माझ्या आयुष्यात अनेक अनुभव आहेत, पण आज तू घेतलेली ही मुलाखत माझ्या कायम लक्षात राहील.”हे उत्तर ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चौथीतील एका विद्यार्थिनीनं आत्मविश्वासानं घेतलेली मुलाखत आणि त्यावर मुख्यमंत्र्यांची दिलखुलास प्रतिक्रिया याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

सामान्यतः कुठल्याही राजकीय व्यक्तीची मुलाखत घेणं हे पत्रकारांसाठी सुद्धा चॅलेंजिंग असतं. मात्र या चौथीत शिकणाऱ्या मुलीने मुख्यमंत्र्याची मुलाखत ज्या धाडसाने घेतली आहे. ते मात्र पाहण्यासारखं आहे. एका सामान्य कुटुंबातील, टॅक्सी चालकाच्या मुलीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आत्मविश्वासाने घेतलेली ही मुलाखत हा केवळ कौतुकाचा विषय नसून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे. त्यामुळे यशश्री घुले हिच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.