
SIR : नगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत आहे. मतदार यादी अचूक, अद्ययावत व विश्वासार्ह ठेवण्यासाठी तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात हे अभियान मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन परिगणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करीत असून मतदारांना आवश्यक माहिती देत अभियानाविषयी जनजागृतीही करीत आहेत.
नक्की पहा : कोपरगाव तालुक्यात गांजाची शेती; सुरेगावातून गांजाची झाडे जप्त
नागरिकांना आवाहन
याबाबत सुधीर पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी भेट देतील, त्यावेळी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे. त्यांनी दिलेले परिगणना प्रपत्र काळजीपूर्वक भरून विहित मुदतीत जमा करावे. आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून दिल्यास मतदार यादी अद्ययावत करण्याचे कार्य अधिक वेगाने व अचूकपणे पूर्ण होण्यास मदत होईल.
हेही वाचा : रॉड तुटल्याने स्कूल बस पलटी; १५ ते २० विद्यार्थिनी किरकोळ जखमी
पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा पाया (SIR)
ते पुढे म्हणाले की, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियान हे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे अभियान आहे. अचूक मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदार यादीतील माहिती अद्ययावत ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.


