Vikhe vs Jarange : विखे पाटील मराठ्यांसाठी कलंक, षडयंत्र रचल्याचा आरोप; मनोज जरांगेंचा संतप्त पवित्रा

0
Vikhe vs Jarange : विखे पाटील मराठ्यांसाठी कलंक, षडयंत्र रचल्याचा आरोप; मनोज जरांगेंचा संतप्त पवित्रा
Vikhe vs Jarange : विखे पाटील मराठ्यांसाठी कलंक, षडयंत्र रचल्याचा आरोप; मनोज जरांगेंचा संतप्त पवित्रा

Vikhe vs Jarange : नगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अकराव्या दिवशीही तीव्रतेने सुरू असून, सरकार आणि जरांगे यांच्यातील संभाव्य चर्चेआधीच दोन्ही बाजूंमधील संघर्ष कमालीचा ताणला गेला आहे. या तणावाला मुख्यत्वे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विधान कारणीभूत ठरले. जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचे सर्व मार्ग आणि पर्याय आता संपले आहेत, असे विधान विखे पाटील यांनी केले होते. या विधानावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या विखे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक आणि एकेरी भाषेत हल्लाबोल केला. विखे पाटील यांनी मराठा समाजाचे अतोनात नुकसान केले असून ते समाजासाठी कलंक ठरल्याचा थेट आरोप त्यांनी केला, तसेच त्यांना अंतरवलीत न येण्याचे स्पष्ट आव्हान दिले.

हेही वाचा : लोणीतील शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाला राम शिंदे यांच्यासह आमदारांची दांडी; विखे पाटील-राम शिंदे यांच्यातील दुरावा कायम?

जरांगेंचा संताप

पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी विखे पाटलांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे, बावनकुळेंची बाजू घेणे आणि गोड बोलून मराठा समाजाची फसवणूक करणे हेच तुमचे पर्याय होते का?” असा सवाल त्यांनी केला. “वैयक्तिक मंत्रिपदावर कोणी काही बोलणार नाही, परंतु जोपर्यंत तुमच्याकडे मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा शिक्का आहे, तोपर्यंत तुम्हाला समाजाची कामे करावीच लागतील,” असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. “उपसमितीच्या आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांमध्ये विखे पाटील हे सर्वाधिक निष्क्रिय ठरले असून त्यांनी समाजाला अर्ध्या पुरात नेऊन सोडून दिले आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

नक्की पहा : सुजय विखेंचं नाव पुढंच…,पण संधी का हुकते? ‘नगर-मनमाड’चा स्पीड ब्रेकर? की आणखी काही?

देवेंद्र फडणवीसांचे गुणगान (Vikhe vs Jarange)

“सातारा संस्थानचे गॅझेटियर महिनाभरात देण्याचे आणि ५८ लाख नोंदींची यादी देण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले होते, मात्र प्रत्यक्षात काहीच दिले नाही,” अशी टीका जरांगे यांनी केली. “विखे पाटील हे केवळ देवेंद्र फडणवीसांचे गुणगान गाण्यात व्यस्त असून शरद पवारांनी काही दिले नाही हेच तुणतुणे वाजवत आहेत”, असा टोला त्यांनी लगावला. एवढेच नव्हे तर “देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील यांचे मिळून एक षडयंत्र ठरले असून, रॅलीदरम्यान हल्ला घडवून आणण्याचा डाव आखला जात” असल्याचा गंभीर संशय जरांगे यांनी व्यक्त केला.

विखे काय म्हणाले? (Vikhe vs Jarange)

दुसऱ्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून जे जे सकारात्मक आणि शक्य निर्णय घेणे गरजेचे होते, ते सर्व निर्णय घेण्यात आले आहेत. या सर्व निर्णयांची आणि सरकारच्या भूमिकेची सविस्तर माहिती मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली होती. परंतु, एवढे करूनही जर जरांगे यांचे समाधान होत नसेल, तर सरकारसमोर आता कोणताही दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही.” यावर मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.