Walse-Patil opposes Dimbhe-Manikdoh tunnel : नगर : कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यते अंतर्गत डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील पाणीप्रश्नावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. एकीकडे या बोगद्यामुळे पारनेर, कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी या निर्णयाला विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
अहिल्यानगरला फायदा
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या अंतर्गत डिंभे ते माणिकडोह दरम्यान सुमारे १६ किलोमीटर लांबीचा जोड बोगदा उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने कुकडी लाभक्षेत्रातील सुमारे दीड लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे विखे पिता-पुत्रांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे. या निर्णयामुळे डिंभे धरणातून येडगाव धरणासाठी आरक्षित असलेले ६.२१७ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचा मार्ग सुकर होणार असून, कुकडी डाव्या कालव्याच्या आवर्तनातील अडथळे दूर होऊन लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.
नक्की वाचा : भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा; जिल्हा प्रशासन व लष्कर प्रशासनामध्ये सामंजस्य करार
वळसेंची ‘ही’ मागणी (Walse-Patil opposes Dimbhe-Manikdoh tunnel)
या निर्णयाला दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कुकडी प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात डिंभे-माणिकडोह बोगद्याचा समावेश नसताना हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांवर अन्याय होईल, अशी भूमिका त्यांनी यापूर्वीही मांडली होती. १८ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत बोगद्याबाबत पुनर्विचाराचे आश्वासन देण्यात आले होते, तरीही आता त्याला मंजुरी देण्यात आल्याने वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्तावाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाणी संघर्ष पेटणार (Walse-Patil opposes Dimbhe-Manikdoh tunnel)
राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या छाननीनंतर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने हा प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव-शिरूर-जुन्नर विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर-कर्जत-श्रीगोंदा असा पाणीवाटपाचा नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोगद्यामुळे कोणाच्या वाट्याला किती पाणी येणार आणि कोणत्या भागाच्या पाण्यावर परिणाम होणार, यावरून आगामी काळात राजकीय आणि शेतकरी संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.



