
Devendra Fadnavis : नगर : शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्यावर आम्ही जेवढे प्रेम केले, त्याच्या दुप्पट प्रेम आम्ही अक्षय कर्डिलेवर (Akshay Kardile) करू. तो जी कामे मागेल, त्याला निधी दिला जाईल. सगळ्यांच्या आशीर्वादाने अक्षय जिंकेल. लोकांनी ठरविले आहे की, मोठ्या मताधिक्याने विजयी करू. आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणुकांची धुरा संभाळली आहे. या निवडणुकीतील अक्षय कर्डिले यांना मत म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. अक्षय तुमचा आहे, त्याला सर्वाधिक मताधिक्याने विजयी करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई; वर्षभरात १५५ प्रकरणांमध्ये हस्तक्षेप, ७ गुन्हे दाखल

यांची उपस्थिती
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी आज (ता.२०) राहुरीत सभा झाली, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, संग्राम जगताप, विक्रमसिंह पाचपुते, अमोल खताळ, काशिनाथ दाते, विठ्ठलराव लंघे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, उमेदवार अक्षय कर्डिले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
फडणवीस म्हणाले की (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही पोटनिवडणूक झाली नसती तर अधिक आनंद झाला असता. शिवाजीराव कर्डिले आनंदी व उमेदी व्यक्तिमत्व होते. मी त्यांच्या बरोबर अनेक वर्षे काम केले. आमच्यात चांगली मैत्री होती. ते जनतेचे माणूस होते. जनतेला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मी त्यांना किती फिरता असे विचारले असता, त्यांनी रोज ६० ते १०० किमी फिरत असल्याचे सांगितले. ते धोरणी राजकारणी होते. ते पैलवान गडी होते. मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यावरही त्यांनी आराम केला नाही. त्यांनी जनतेत जाणे सोडले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली. त्यांनी राजकारणात कधीही माघार घेतली नाही. संघर्ष सोडला नाही. लोकांना प्रसन्न ठेवण्याची कला त्यांच्याकडे होती.
संरक्षण प्रकल्पासाठी जागा देण्यात आली
सहा सहा वेळा निवडून येणे सोपे नाही. जनतेच्या मनावर अधिराज्य मिळविण्याचे काम त्यांनी केले. असे नेतृत्व गेल्यावर मनाला चटका लगतो. कर्डिले वांबोरी चारी व निळवंडेचे प्रश्न मांडायचे. कर्डिले यांच्या आग्रहास्तव सव्वाशे कोटी रुपये वांबोरी चारीला दिले. निळवंडे पाटाचे काम केले. प्रत्येक गावात पाणीसाठा कसा तयार करता येईल, हा आपला प्रयत्न आहे. उद्योग मोठ्या प्रमाणात अहिल्यानगर जिल्ह्यात येणार आहेत. नवीन एमआयडीसी आणून युवकांच्या हाताला काम देण्यात येईल. जिल्ह्यात संरक्षण प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे. त्यातून मोठा रोजगार उपलब्ध होईल. मी अक्षय कर्डिलेला बेरर चेक देऊन चाललो आहे. त्यातून मतदारसंघाची विकासकामे होतील. महाराष्ट्रात संस्कृती आहे की, पोटनिवडणूक ही बिनविरोध होते. मात्र, तसे आता दुर्दैवाने होताना दिसत नाही.
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जमाफी दिली जाईल
मी प्राजक्त तनपुरेंना फोन करून विनंती केली की, तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या. त्यांनी माघार घेतली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जमाफी दिली जाईल. शेतकऱ्यांना दिवसा व मोफत वीज देण्यात येईल. लाडक्या बहिणीची योजना बंद होईल, असे लोकांना वाटले होते. मात्र, ही योजना आम्ही कधीही बंद करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला की, महिलांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिले. त्यासाठी ३३ टक्के जागा देण्यासाठी संविधान संशोधन कायदा आणला होता. दुर्दैवाने विरोधीपक्षांनी महिलांचे प्रतिनिधीत्व वाढून दिले नाही, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.


