Animal Husbandry Department : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश

Animal Husbandry Department : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश

0
Animal Husbandry Department : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश
Animal Husbandry Department : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश

Animal Husbandry Department : नगर : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल-निनोमुळे २०२६ च्या मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील पशुधन संरक्षण व संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असून जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.

हेही वाचा : टोल फ्री हेल्पलाइनमुळे पशुवैद्यकीय सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारात‌; लाखो तक्रारींचे निराकरण

काय आहेत निर्देश

राज्यात सरासरी पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता असून हिरव्या चाऱ्याचे प्रमाण कमी होऊन टंचाई निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत नियोजन करून चारा टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. मका, ज्वारी व बाजरीसारख्या चारा पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच राज्य चारा विकास महामंडळ, अकोला यांच्या माध्यमातून चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. ४ मे २०२६ पूर्वी आदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत असून चारा उत्पादन वाढीसाठी शाश्वत शेती पद्धती, हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन, टीएमआर व कडबाकुट्टी यांसारख्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

नक्की पहा : महिला आरक्षण मोर्चावेळी महिलेने महाजन यांना जाब विचारला

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना (Animal Husbandry Department)

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पशुधन संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करावा, यामध्ये नवीन पाणलोट क्षेत्रांमध्ये चारा लागवडीसाठी विशेष मोहिम राबविणे, टंचाईच्या काळात चारा उपलब्धतेसाठी उपाययोजना करणे व भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी चारा साठवणुकीचे नियोजन करणे अपेक्षित आहे. पशुसंवर्धन विभागाने जिल्हा उपआयुक्त व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने या मोहिमेला प्राधान्य दिले असून पशुपालकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पशुधन संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असून कोणत्याही परिस्थितीत पशुपालकांच्या पाठीशी उभे राहण्याचा विभागाचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.