Saundala : नगर : माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या क्लेशदायक कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सौंदाळा गावातील सरपंचाने चक्क स्वतःच्या हयातीतच स्वतःचे ‘पिंडदान’ आणि ‘दहाव्याचा’ विधी उरकला आहे. सरपंच शरद आरगडे असे या धाडसी व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या पत्नी आणि मुलाने या आगळ्यावेगळ्या विधीमध्ये सहभाग घेत समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला. सामान्यतः हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर १० व्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची प्रथा आहे, मात्र “मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काही करायचे आहे ते डोळ्यादेखत का नको?” असा विचार करून आरगडे यांनी हा निर्णय घेतला. कार्यक्रमात त्यांच्या पत्नी आणि मुलाने शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत जिवंतपणीच त्यांचे पिंडदान केले. विशेष म्हणजे या विधीवेळी अनेक कावळ्यांनीही पिंडाला स्पर्श केल्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अंजन पडले.
हेही वाचा : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश
अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर प्रहार
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद आरगडे यांनी समाजातील काही अनिष्ट रूढींवर बोट ठेवले आहे. माणूस जिवंत असताना त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे आणि मेल्यानंतर मात्र समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विधी करणे, याला त्यांनी विरोध दर्शवला आहे. मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठराविक विधी केल्यानेच गती मिळते, यांसारख्या समजुतींना फाटा देत त्यांनी विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले आहे.
नक्की पहा : टॅंकरची आवश्यकता असेल तर तात्काळ अहवाल द्या: जिल्हाधिकारी
कायदेशीर प्रतिज्ञापत्र (Saundala)
या अनोख्या ‘दहाव्याच्या’ कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे. विचारवंतांकडून आरगडे यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.जिवंतपणी स्वतःचे पिंडदान करून त्यांनी केवळ मृत्यूचे भय घालवले नाही,तर समाजातील कालबाह्य परंपरांना एक प्रकारे ‘मूठमाती’ देण्याचे काम केले आहे. केवळ पिंडदान करून न थांबता, शरद आरगडे यांनी समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवरही प्रहार केला आहे. “माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये,” असे स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र त्यांनी तयार केले आहे.
या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की,त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही सुतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये.पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून, समाजातील जाचक रूढींनी तिला अडकवू नये, हा क्रांतिकारी विचार त्यांनी या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्त्री सन्मानाचा एक नवा पायंडा पडताना दिसत आहे.



