Home Industry | नगर : सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या हाताला काम मिळावे, त्यांना स्वावलंबी बनवावे आणि घराघरात लघुउद्योगांची उभारणी व्हावी या उद्देशाने कल्याण रोड, अनुसया नगर येथील महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती व गृहउद्योग (Home Industry) उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात झाले. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे.
हे वाचा – जिल्ह्यात पाणीटंचाई व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज; टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत
संध्या मेढे यांनी मार्गदर्शन (Home Industry)
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या संध्या मेढे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी करण्याची क्षमता असते. फक्त तिला संधी आणि योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. गृहउद्योगाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होऊ शकते आणि त्या आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतात.” त्यांनी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करावे आणि स्वतःचा ब्रँड निर्माण करावा, असेही आवाहन केले.
हेही वाचा : कोळगाव येथे भीषण आग; लाखोंचे नुकसान
महिलांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी (Home Industry)
या उपक्रमासाठी सीमा शिंदे यांनी पुढाकार घेत परिसरातील महिलांना एकत्र करून रोजगार निर्मितीचे काम उभे केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार असून कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लागणार आहे. महिलांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ॲडव्होकेट युवराज शिंदे यांनी केले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाला रेश्मा आठरे, सीमा शिंदे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रेश्मा आठरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत, मात्र त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. महालक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून ही दरी कमी करण्याचे काम केले जाईल.” त्यांनी महिलांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गृह उद्योगात यश मिळवावे, असा विश्वास व्यक्त केला.
सीमाताई शिंदे यांनी सांगितले की, “कल्याण रोड परिसरातील सर्वसामान्य महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रम राबवत असताना महिलांसाठी काहीतरी ठोस काम करण्याची गरज जाणवत होती. त्यातूनच गृह उद्योग व रोजगार निर्मितीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, येत्या काळात अधिकाधिक महिलांना या उपक्रमात सहभागी करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नक्की पहा : अहिल्यानगरच्या रंगभूमीवर ‘ॲनिमल’चा थरार; सिद्धार्थ जाधवचा अभिनय पाहण्याची संधी
या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यास सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. महिलांचे सक्षमीकरण झाल्यास संपूर्ण कुटुंबाची आर्थिक उन्नती होते आणि पुढील पिढीला चांगले शिक्षण व संधी उपलब्ध होतात, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. महालक्ष्मी महिला मंडळाच्या या उपक्रमामुळे अनुसया नगर परिसरात महिला सक्षमीकरणाची नवी चळवळ सुरू झाली असून येत्या काळात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



