Manoj Jarange Patil : : लाखोंचा समुदाय,भगवे झेंडे घेऊन एक मराठा लाख मराठाच्या घोषणेच्या निनादाने दुमदुमणारी मुंबई आपण काही दिवसांपूर्वी पाहिली होती. त्याचं कारण होत मराठा आरक्षण.(Maratha Reservation) आता याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे (Protest) रणशिंग फुंकले आहे. आज १६ मे ला जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन ते आंदोलनाची पुढील दिशा आणि तारिख ठरवणार आहे. मात्र मनोज जरांगे पुन्हा हे आंदोलन का करत आहेत ते पाहू….
नक्की वाचा: आता वाहनधारकांची खैर नाही! ‘ही’ गोष्ट न केल्यास थेट हजार रुपये दंड, परिवहन मंत्र्यांचा इशारा
राज्यसरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे आणि मराठा समाजाच्या मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.
मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्यामागची प्रमुख कारणे –
१. सगेसोयरे’ आणि गॅझेटची अंमलबजावणी नाही
सरकारने मराठा आणि कुणबी एकच मानून सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे मनोज जरांगे यांनी प्रशासनावर व नेत्यांवर संताप व्यक्त केलाय. तसेच मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,अनेक महिने उलटूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. हैदराबाद गॅझेटबाबत सुद्धा केवळ घोषणा झाली, पण त्याची प्रत्यक्ष आणि कडक अंमलबजावणी अजूनही झालेली नाही, असा आरोप जरांगे यांनी केला आहे.
अवश्य वाचा: सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनात घट करणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
२. कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळण्यात अडचणी
ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदींचे पुरावे सापडले आहेत, त्यांना प्रशासनाकडून ‘जात वैधता प्रमाणपत्र’ (Validity Certificate) मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. पुरावे असूनही अनेक कुटुंबांची अडवणूक केली जात असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती आता नवीन रेकॉर्ड शोधण्यात रस दाखवत नसल्याची टीका जरांगे यांनी केली आहे.
३. सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळातील बोजवारा
मराठा, कुणबी-मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या सारथी या संस्थेत कारभाराचा बोजवारा उडाला आहे. अनेक पदे रिक्त असल्याने योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आणि वेळेवर निधी मिळत नाही. तसेच ‘सारथी’ संस्थेच्या योजनांचा लाभही तरुणांपर्यंत नीट पोहोचत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. मराठा तरुणांना उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी किंवा व्याज परताव्यावर कर्ज देणाऱ्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांवरही जरांगे यांनी आक्षेप घेतला आहे. बँकेच्या जाचक अटी, मंजुरी मिळण्यातील दिरंगाई आणि अनुदानासाठी लागणारा मोठा कालावधी यामुळे गरजू तरुणांना याचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. तसेच महामंडळाच्या योजनेतील लाभार्थ्यांना कर्जाच्या व्याजाचा परतावा नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
४. आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेणे –
गेल्या काही महिन्यांत झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान राज्यातील आंदोलक तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, हे आश्वासन अजूनही केवळ कागदावरच राहिले असून प्रत्यक्षात गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. हे एक कारण देखील मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन करण्याचे मानले जात आहे
५. शेतकऱ्यांचे प्रश्न –
मराठा आरक्षणासोबतच राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून त्यांना योग्य भाव मिळत नाहीये. समाजातील आर्थिक आणि सामाजिक स्तर खालावत चालल्याने सरकारला जागे करण्यासाठी हा एल्गार पुकारण्यात येत असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. या सगळ्या बाबींमुळे मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत.
“सरकारला कितीही मायेने सांगितले तरी ते आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसणार नाहीत,”अशा कडक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. सरकारला मराठा समाजाची कामे होऊ द्यायची नाहीत. मराठ्यांची मुले आज कर्जबाजारी होत आहेत आणि या परिस्थितीला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही. जर आपल्याला आपले हक्क मिळवायचे असतील, तर समाजातील प्रत्येक बांधवाला पुन्हा एकदा कट्टरतेने आंदोलनाच्या पवित्र्यात यावे लागेल, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन करण्याचे ठरवले असल्याचं सांगितलं जात आहे.



