Chief Minister Fadnavis: कृषि नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र कृषि उद्योजकतेसाठीचे प्रभावी व्यासपीठ: मुख्यमंत्री फडणवीस

ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

0

Chief Minister Fadnavis : राहुरी: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथे उभारण्यात येणारा कृषि नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र हा प्रकल्प राज्याच्या कृषि क्षेत्रातील नवसंशोधन आणि कृषि उद्योजकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असेल. या केंद्राच्या माध्यमातून जे संशोधन विस्तारक्षम, विक्री योग्य तसेच उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरेल अशा संशोधनास सर्वतोपरी उपयोगी ठरेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Fadnavis) यांनी व्यक्त केला. 

अवश्य वाचा- गळफास घेत ३५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन; राहुरी फॅक्टरी येथील घटना

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन (Chief Minister Fadnavis)

पुणे कृषि महाविद्यालयामध्ये उभारण्यात येणार्या कृषि नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकूलपती  दत्तात्रय भरणे, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, विधान परिषद सदस्य आमदार योगेश टिळेकर, विधानसभा सदस्य आमदार हेमंत रासने, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, कृषि आयुक्त सुरज मांढरे (भाप्रसे), पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (भाप्रसे) आणि जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (भाप्रसे), पुणे जिल्हा परिषद, कृषि पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती अमोल नलावडे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. दत्तात्रय उगले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषि विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. डी.बी. लाड, आत्मा, प्रकल्प संचालक सुरज मडके आणि पुणे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गेल्या वर्षी आयोजित अॅग्री हॅकथॉन कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी कृषि महाविद्यालय, पुणे येथे कृषि नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. या गोष्टीच्या पूर्ततेच्या दिशेने  महत्वपूर्ण पाऊल उचलत मा. जिल्हाधिकारी, पुणे  जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून कृषि महाविद्यालय परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी व संवर्धनासाठी सुमारे चार कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी या केंद्राची मुख्य उद्दिष्टे व भूमिका विषद करत असताना हे केंद्र तंत्रज्ञान व्यापारीकरण, कृषि क्षेत्रातील कृषि विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये विकसित झालेल्या नवीन तंत्रज्ञानाचे पेटंट मिळवणे, त्याचे प्रमाणीकरण करणे आणि ते बाजारात आणण्यासाठी मदत करणे, नवोदित उद्योजक  (स्टार्टअप्सना) उद्योग क्षेत्रातील तज्ञ, कृषि वैज्ञानिक आणि व्यावसायिक सल्लागारांची जोडून देणे, पायाभूत सुविधा पुरवणे, तसेच कृषि विद्यापीठे, कार्पोरेट कंपन्या, सरकारी धोरणकर्ते आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यात समन्वय साधणारा दुवा म्हणून हे केंद्र काम करील अशी ग्वाही दिली.  डॉ. साताप्पा खरबडे यांनी या केंद्राच्या माध्यमातून कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता, तसेच विविध तंत्रज्ञान जसे मशीन लर्निंग, हवामान बदल, अनुकूल शेती परिसंस्था, अचूक शेतीचे घटक जसे ड्रोन व प्रगत पाणीपुरवठा, जैव व जैविक शेती, प्रगत शेती अवजारे, कार्बन क्रेडिट, व्यापार तंत्रज्ञान, शाश्वत शेती आणि कृषि आधारित आर्थिक तंत्रज्ञान या नवसंकल्पनेचा विस्तार इ. मुख्य लक्ष असतील असे नमूद केले. डॉ. सुभाष भालेकर यावेळी म्हणाले की या कृषि नवोन्मेष आणि उष्मायन केंद्राचे भागीदार कृषि शैक्षणिक व विविध संशोधन संस्था राहतील. या केंद्राचे लाभार्थी पुणे कृषि हे हॅकथॉन मधील सहभागी विजेते, नवकल्पक विद्यार्थी, नवोदित उद्योजक आणि शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषि पदवीधर असतील असे त्यावेळी म्हणाले. यावेळी पुणे येथील महाराष्ट्र कृषि तंत्रज्ञ संस्थेचे अध्यक्ष व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किसन लवांडे, कार्यकारी अध्यक्ष व माजी कृषि आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला माजी कुलगुरू डॉ. वेंकट मायंदे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख आणि या संस्थेचे महासचिव व माजी संचालक (निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण) डॉ. सुदाम अडसूळ तसेच कृषि महाविद्यालय पुणेचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.