Pathardi : महिला बस वाहकाला मारहाण; विनयभंगाचा गुन्हा दाखल

0
Pathardi : महिला बस वाहकाला मारहाण; विनयभंगाचा गुन्हा दाखल
Pathardi : महिला बस वाहकाला मारहाण; विनयभंगाचा गुन्हा दाखल

Pathardi : पाथर्डी : शेवगाव आगाराच्या एका महिला बस वाहकाला तिसगाव (ता. पाथर्डी) येथे बसमध्येच मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून एचआर हेडवर हल्ला

नेमकं काय घडलं?

संबंधित महिला शेवगाव आगारात बस वाहक म्हणून कार्यरत आहेत. काल (ता. १ जून) रोजी त्या शेवगाव ते अहिल्यानगर या मार्गावरील बसवर कर्तव्य बजावत होत्या. सायंकाळी तिसगाव बसस्थानकावर बस थांबली असताना काही प्रवासी उतरले व काही नवीन प्रवासी बसमध्ये चढले. त्यावेळी मागून वाहने येत असल्याने बसचा दरवाजा ओढताना एका प्रवाशाच्या बोटाला दरवाजा लागला. याचा राग आल्याने संबंधित प्रवासी शिवीगाळ करू लागला. महिला वाहकांनी त्यास जाब विचारला असता त्याने दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने महिला वाहकाच्या अंगाला हात लावून विनयभंग केला तसेच हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सुमारे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून हरविल्याचेही सांगण्यात आले आहे.

नक्की पहा : विस्कळीत विजपुरवठ्यावरुन नगरकर संतापले…

कठोर कारवाईची मागणी (Pathardi)

संबंधित महिला वाहकाने पोलीस प्रशासन तसेच राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. महिला कर्मचारी म्हणून आमच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सार्वजनिक वाहतूक सेवेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.