
Adulteration-free campaign : श्रीरामपूर : श्रीरामपूर : राज्यातील अन्न भेसळ, दूध भेसळ आणि रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात कठोर कारवाई सुरू करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या मोहिमेला आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवत श्रीरामपूर ते शिर्डी (Shrirampur to Shirdi) अशी पायी पदयात्रा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या पदयात्रेदरम्यान त्यांनी डोक्यावर भारतीय संविधान घेतले असून अंगावर संविधान आणि तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ संदेश लिहिलेले पोस्टर परिधान केले आहेत.
नक्की वााचा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
भेसळ करणाऱ्यांविरोधात राज्यभर मोहीम
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतीच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. गेल्या २१ वर्षांत तब्बल २५ वेळा बदली झालेल्या मुंढे यांच्या कार्यशैलीची राज्यभर चर्चा असते. प्रशासनातील पारदर्शकता, नियमांची कठोर अंमलबजावणी आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिका यामुळे त्यांची ओळख ‘कडक अधिकारी’ अशी निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात रुजू होताच त्यांनी भेसळ करणाऱ्यांविरोधात राज्यभर मोहीम सुरू केली आहे.विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेक ठिकाणी खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध दूध संकलन केंद्रांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात पामतेल, रासायनिक पदार्थ आणि केमिकलचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे भेसळ माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
भर उन्हात वाकडी मार्गे शिर्डीकडे पायी प्रस्थान (Adulteration-free campaign)
तुकाराम मुंढे यांच्या या धाडसी कारवाईला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथून त्यांनी भर उन्हात वाकडी मार्गे शिर्डीकडे पायी प्रस्थान केले. डोक्यावर भारतीय संविधान घेऊन आणि अंगावर संविधान व जनजागृती करणारे संदेश परिधान करून सुरू केलेली ही पदयात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.“भेसळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रशासनाला समाजाने साथ दिली पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी काम करत असताना समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,” अशी भावना अशोक लोंढे यांनी व्यक्त केली.या पदयात्रेमुळे परिसरात संविधान, नागरिकांची जबाबदारी आणि अन्न सुरक्षा याविषयी जनजागृती होत आहे.
अनेक नागरिकांनी रस्त्यावर थांबून लोंढे यांच्या आंदोलनाचे स्वागत केले. काहींनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत “ही केवळ पदयात्रा नसून समाजजागृतीची चळवळ आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या.तुकाराम मुंढे यांच्या भेसळमुक्त मोहिमेला मिळणारा हा लोकसमर्थनाचा आवाज प्रशासनासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे येत्या काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


