AMC : नगर : शहरातील पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आकर्षक करण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत पाईपलाईन रोडवरील अनाधिकृत टी.व्ही. केबल व इतर अनधिकृत केबल हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे पाईपलाईन रोड आता मोकळा आणि सुरक्षित श्वास घेणार आहे.
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात झाली अवघी ५१ टक्के खरीप पेरणी
सी.सी.टी.व्ही. केबल वगळता इतर केबल्सवर हातोडा
महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सी.सी.टी.व्ही. केबल्स या कारवाईतून वगळण्यात आल्या आहेत. केवळ वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या तसेच शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत केबल्सवरच ही कारवाई केली जात आहे. या धडक मोहिमेमुळे पाईपलाईन रोडवरील धोकादायक पद्धतीने लटकणाऱ्या वायर्सचे जाळे नष्ट होणार आहे. यामुळे रस्त्यांवरील संभाव्य अपघात आणि अडथळे कमी होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होईल. तसेच शहराचे सौंदर्य आणि शिस्त जपण्यास यामुळे मदत होणार आहे.
नक्की पहा : हायवेवर पोलिसांकडून अपहरण झालेल्या पर्यटकांची अशी झाली सुटका
मनपाचे आवाहन (AMC)
या धडक कारवाईसोबतच महानगरपालिकेने संबंधित केबल चालकांना आणि सेवा पुरवठादारांना कडक इशारा दिला आहे. शहरात यापुढे कोणत्याही ठिकाणी अनाधिकृत पद्धतीने टी.व्ही. केबल किंवा इतर वायर्स टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध केबल व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही मोहीम पुढील काळात संपूर्ण शहरात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी नागरिक व संबंधित सेवा पुरवठादारांनी महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



