Agriculture Day : नगर : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती, जलसंधारण, पीक विविधीकरण व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे ही आजची गरज आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठे व शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करून कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
हेही वाचा : निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीप्रकरणी कृषी विभागाची कारवाई; परवाना निलंबित, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
कृषी दिन उत्साहात
जिल्हा परिषदेच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा कृषी अधिकारी सुधीर शिंदे, आत्मा प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, पशुसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
नक्की पहा : HSRP नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई
शेतकऱ्यांचा गौरव (Agriculture Day)
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सर्वांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत सांगितले की, एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी राज्यात व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. जुलै महिन्यातही पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभाग व कृषी विद्यापीठांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. आपल्या तालुक्यातील हवामान, मातीचा प्रकार आणि उपलब्ध पाण्याचा विचार करून कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.



