Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधील ‘त्या’ गोळीबार प्रकरणाचा फिर्यादीच निघाला ‘मास्टरमाईंड’ ; प्रकरण काय?

0
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधील 'त्या' गोळीबार प्रकरणाचा फिर्यादीच निघाला 'मास्टरमाईंड' ; प्रकरण काय?
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधील 'त्या' गोळीबार प्रकरणाचा फिर्यादीच निघाला 'मास्टरमाईंड' ; प्रकरण काय?

नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar Crime) पाईपलाईन रोड परिसरातील तुळजाभवानी मंदिराजवळील चहाच्या दुकानासमोर झालेला हल्ला (Attack) व हवेत गोळीबार (Firing in the air) प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. कारण या गुन्ह्यातील फिर्यादीच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याने स्वतः वर हल्ला घडवून आणण्यासाठी सुपारी दिल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या मुख्य संशयित आरोपीने दिली. त्यानंतर तोफखाना पोलिसांकडून फिर्यादीला आरोपी करण्याची प्रक्रिया काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आता फिर्यादी पसार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नक्की वाचा: पैशांच्या व्यवहारातून तरुणाला रॉडने मारहाण; चौघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं? (Ahilyanagar Crime)

२४ मे रोजी फिर्यादी चिरंजीव दत्तात्रय गाढवे हा त्याच्या मित्रासह पाईपलाईन रोडवरील पुणेरी अमृततुल्य येथे चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी गाढवेवर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार केला. तसेच टणक वस्तूने मारत लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली. यावेळी घटनास्थळावरून पळताना एकाने कमरेतील पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. त्यानंतर सर्वजण मोपेड करून पसार झाले होते. या घटने प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तोफखाना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता काळ्या रंगाच्या मोपेडवर चार युवक तोंडाला मास्क बांधून घटनास्थळावरून पळून जात असल्याचे दिसून आले.

अवश्य वाचा: अखेर भोंदू राजेंद्र गडगे याला  मिळाला जामीन; दुर्धर आजार बरे करण्याचा केला होता दावा

संशयित आरोपीनेच दिली कबुली (Ahilyanagar Crime)

तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी ऋतिक आनंद हरिहर हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ऋतिक हरिहर याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, हा हल्ला फिर्यादी चिरंजीव गाढवे यांनीच सुपारी देऊन घडवून आणलाय. संशयित आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले गावठी पिस्तुल यावेळी पोलिसांनी जप्त केलं आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदिश भांबळ, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांसह पथकाने केली आहे.  मात्र या घटनेतील फिर्यादीने स्वतःच्याच हल्ल्याचा कट का रचला याच कारण मात्र अजून समोर आलेले नाही.