Ahilyanagar-Pune Water Conflict : डिंभे-माणिकडोह बोगद्याविरोधात दिलीप वळसे पाटील मैदानात; अहिल्यानगर-पुणे पाणी संघर्षात महायुतीतील दोन नेत्यांचा सामना रंगणार?

0
महायुतीतील दोन नेत्यांचा सामना रंगणार?
महायुतीतील दोन नेत्यांचा सामना रंगणार?

Ahilyanagar-Pune Water Conflict : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड तालुक्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रस्तावित असलेल्या डिंभे-माणिकडोह धरणजोड बोगद्याला आता पुणे जिल्ह्यातून पुन्हा विरोधाचा सूर उमटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध करत, “डिंभे-माणिकडोह बोगदा होऊ देणार नाही, म्हणजे नाही,” असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मुद्द्यावर अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दिलीप वळसे पाटील या दोन महायुतीतीलच नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष आगामी काळात रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डिंभे-माणिकडोह धरणजोड प्रकल्पासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेत्यांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह श्रीगोंदा व कर्जत-जामखेड तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांनी या प्रकल्पासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, पुणे जिल्ह्यातील नेत्यांकडून या प्रकल्पाला सातत्याने विरोध होत असल्याने हा प्रश्न रखडला होता. बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी देखील ही मागणी लावून धरली.

हेही वाचा : अहिल्यानगरच्या दुष्काळमुक्तीच्या दिशेने मोठं पाऊल; मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर जिल्ह्याच्या सिंचन विकासाला गती

अहिल्यानगरच्या सिंचनाला गती

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी डिंभे-माणिकडोह धरणे बोगद्याद्वारे जोडण्याच्या प्रलंबित निर्णयाला गती दिली. त्यामुळे पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, आता या निर्णयाला दिलीप वळसे पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. “हा बोगदा होऊ नये यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला मी तयार आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी या प्रश्नावर माजी आमदार अतुल बेनके आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन संघर्षाची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगत, त्यांच्यावर विश्वास ठेवून काही काळ प्रतीक्षा करण्याचे आवाहनही वळसे पाटील यांनी केले आहे.

अजितदादांच्या आश्वासनाची आठवण (Ahilyanagar-Pune Water Conflict)

डिंभे-माणिकडोह बोगद्यामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेत आपली भूमिका मांडली. या बोगद्यामुळे परिसरातील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. तसेच, १८ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगदा न करण्याबाबत देण्यात आलेल्या आश्वासनाची आठवणही वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली. याशिवाय आपण पक्ष फुटीच्यावेळी अजितदादांसोबत का गेलो, त्याचे हेच कारण असल्याचेही वळसे पाटील म्हणाले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0aGeographic

महायुतीत संघर्षाची शक्यता (Ahilyanagar-Pune Water Conflict)

एकीकडे अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पाला पुढे नेण्याची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा मुद्दा पुढे करत दिलीप वळसे पाटील यांनी प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे डिंभे-माणिकडोह बोगद्याचा प्रश्न आता केवळ पाण्यापुरता मर्यादित न राहता अहिल्यानगर विरुद्ध पुणे असा पाणी संघर्ष आणि दोन प्रभावी नेत्यांमधील राजकीय संघर्ष, अशी नवी दिशा घेण्याची शक्यता आहे. आगामी काळात मुख्यमंत्री फडणवीस या दोन्ही बाजूंमध्ये नेमका कोणता मार्ग काढतात, याकडे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, वळसे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे डिंभे-माणिकडोह बोगद्याचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.