नगर : तप्त लोखंडावर घणाचे घाव घालत आकार देण्यात निष्णात असलेल्या एका कष्टकरी दाम्पत्याने आपल्या मुलालाही शिक्षणाच्या भट्टीत तापवून जिद्दीच्या ऐरणीवर सातत्याचे घाव घालत आकार दिला आणि त्याच्यातून भारतीय वन सेवेतील एक अधिकारी (Indian Forest Service Officer) घडविण्याची किमया साधली. ही यशोगाथा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अक्षय पवार (Akshay Pawar) या युवकाची. त्याने कसे यश मिळवले चला जाणून घेऊ…
नक्की वाचा: वैराग्याच्या आनंदोत्सवात मधुरा भंडारी झाल्या ‘प्रियदा महाराज’
हरीभाऊ पवार यांनी लोखंडावर घाव घालत अक्षयला शिकविले (Akshay Pawar)

पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात राहणाऱ्या हरिभाऊ पवार यांनी पत्नीसह उन्हाचे चटके सोसत मुलाला शिक्षणाच्या भट्टीत तावून सुलाखून आयएफएस अधिकारी केले. त्यांचा मुलगा अक्षय हरिभाऊ पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेत देशात ८१ वी रैंक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. घिसाडी समाजातील या तरुणाच्या यशामुळे संपूर्ण पाथर्डी तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवश्य वाचा: सोलापूर महामार्गावर वाहन पलटी, तरुण वकिलासह दोन ठार
अक्षयचा शैक्षणिक प्रवास नेमका कसा? (Akshay Pawar)
अक्षयचे आई वडील हे पारंपरिक पद्धतीने लोखंड तापवून शेतीची अवजारे तयार करण्याचे काम करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही, लोखंडावर घाव घालत त्यांनी जशी शेतीची अवजारे घडवली,त्याच जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी आपल्या मुलाचे भविष्यही घडवले. विशेष म्हणजे, अक्षयसुद्धा आई-वडिलांच्या कामात मदत करत अभ्यास करत होता.
अक्षयचे प्राथमिक शिक्षण नाथनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालयात पूर्ण केले. पुढे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून धातुशास्त्र विषयात बी.टेक. पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अक्षयने एक वर्ष पाथर्डीत, तर तब्बल अडीच वर्षे दिल्लीमध्ये राहून कठोर परिश्रम घेतले. २०१९ पासून सुरू झालेला त्याचा अभ्यासाचा प्रवास कोविड काळात काहीसा खंडित झाला, मात्र २०२१ मध्ये नव्या जोमाने त्याने पुन्हा तयारी सुरू केली.
अपयशाने न खचता सातत्य कायम ठेवत चौथ्या प्रयत्नात त्याने हे मोठे यश मिळवले. अक्षय पवार याला मुलाखतीसाठी पाथर्डीचे भूमिपुत्र तथा तेलंगणाचे पोलिस महासंचालक महेश भागवत यांनी विशेष मार्गदर्शन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाल्याचे अक्षयने सांगितले. यंदा देशभरातून १४८ उमेदवारांची भारतीय वन सेवेत निवड झाली. त्यामध्ये अक्षयसह २० मराठी उमेदवारांचा समावेश आहे.



