Madhura Bhandari: वैराग्याच्या आनंदोत्सवात मधुरा भंडारी झाल्या ‘प्रियदा महाराज’

महाराष्ट्रासह देशभरातून हजारो आनंदभक्तांची उपस्थिती

0

Madhura Bhandari: पाथर्डी: येथे जैन धर्मातील वैराग्य, संयम आणि आत्मशुद्धीचा ऐतिहासिक भगवती दीक्षा महोत्सव उत्साहात पार पडला. संगमनेर येथील मधुरा भंडारी (Madhura Bhandari) यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून जैन साध्वी जीवनाचा स्वीकार करत दीक्षा घेतली. दीक्षेनंतर त्यांचे नामकरण ‘प्रियदा महाराज’ असे करण्यात आले. उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांच्या मंगल मंत्रोच्चारात हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय येथे सोमवारी (ता.११) सकाळी हा दीक्षा महोत्सव पार पडला. यावेळी तीर्थेशऋषीजी, सुनंदाजी महाराज यांच्यासह अनेक दिग्गज साधू-साध्वींची उपस्थिती होती. हजारो आनंदभक्त आणि जैन समाजबांधवांच्या जयघोषात नवदीक्षार्थींना जैन धर्माच्या शासनाचे मंत्र देण्यात आले. नामकरण होताच उपस्थितांनी “जैन धर्माच्या जय जय काराच्या ”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. या सोहळ्यासाठी आमदार मोनिका राजळे, अँड. प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, माधव बाबा, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, नगरसेवक बजरंग घोडके, अमोल गर्जे, अँड. शिवाजी काकडे,बंडू बोरुडे, योगेश रासने, ज्योती शर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा-  पारनेरकरांनी अनुभवला निकाली कुस्त्यांचा थरार; सोलकर व कावरेने वेधले लक्ष

महाराष्ट्रासह देशभरातून हजारो आनंदभक्तांची उपस्थिती (Madhura Bhandari)

महाराष्ट्रासह देश भरातून आलेल्या हजारो आनंदभक्तांनी या धार्मिक सोहळ्यास उपस्थिती लावली. मधुरा भंडारी या संस्कृत विषयातील पदवीधर असून त्यांनी धार्मिक शिक्षणासोबत ‘सिक्रेट ऑफ कर्मा’च्या प्रशिक्षक म्हणूनही कार्य केले आहे. आधुनिक जीवनातील यश, सुखसोयी आणि ऐश्वर्याचा त्याग करून त्यांनी संयम, तपस्या आणि वैराग्याचा मार्ग स्वीकारला. दीक्षेनंतर प्रियदा महाराज यांच्या चेहऱ्यावर झळकणारे समाधान, तेज आणि आत्मिक आनंद उपस्थितांना भावूक करून गेले. १ मे रोजी पाथर्डीत त्यांच्या आगमनानंतर शहरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. कुंकुम, माहेरा, रक्षाबंधन, मेहंदी समारंभ आणि वरघोडा यांसारख्या पारंपरिक विधींनी संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी, धार्मिक पताका आणि मंगल ध्वनींनी परिसर सजविण्यात आला होता. स्व. मोतीलालजी गुगळे परिवाराच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज यांनी नवदीक्षार्थी मधुरा भंडारी अर्थात नवदीक्षित प्रियदा महाराज यांना आपल्या प्रवचनातून संयम, गुरु आज्ञापालन आणि आत्मकल्याणाचा संदेश दिला. प्रभू आणि गुरु यांच्या आज्ञेत राहून आत्मानुभूती प्राप्त करा. गुरु आज्ञा हेच जीवनातील सर्वात मोठे वरदान असून, निरंतर गुरु भक्तीत राहून सत्य आणि संयमाच्या मार्गावर चालत राहावे. अशी साधना करा की, जिनशासनाचा ऋषिध्वज तुम्हाला प्राप्त व्हावा. तुमच्या आचरणामुळे कोणत्याही जीवाला भय वाटू नये आणि तुमचे जीवन पाहून समाजात जिनशासनाविषयी आदर व श्रद्धा निर्माण व्हावी, असे त्यांनी सांगितले.तसेच संयमाच्या मार्गावर आनंदाने आणि दृढ निष्ठेने पुढे चालत राहा असा मोलाचा उपदेशही त्यांनी नवदीक्षार्थींना केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोक्षमार्गाकडे नेणारे सर्वोच्च पाऊल (Madhura Bhandari)


कांतीलालजी, अशोकलालजी, अजितलालजी गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय, हेमंत, मनीष, आनंद आणि सुनील गुगळे यांनी व्यवस्थेची धुरा सांभाळली. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने या सोहळ्याचे अत्यंत नेटके नियोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाषशेठ चोरडिया, सतीश गुगळे, सुरेशलालजी गुगळे, डॉ. सचिन गांधी, डॉ. अभय भंडारी, सचिन भंडारी, पंकज मुनोत, धीरज गुंदेचा, निलेश बोरा, अनिल खाटेर, चंदन कुचेरिया, प्राचार्य अजय भंडारी यांच्यासह श्री तिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळ,जैन युथ फेडरेशन, प्रतिभा, सुविधि, भक्ताम्बर, जिनेश्वरी, हितेश्वरी कन्या मंडळ, आनंद चालीसा ग्रुप, श्री महावीर युवा मंच, धर्म प्रभावना व आनंद जैन पाठशाळा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले.जैन धर्मामध्ये ‘भगवती दीक्षा’ ही आत्मकल्याण, अहिंसा, अपरिग्रह आणि मोक्षमार्गाकडे नेणारे सर्वोच्च पाऊल मानले जाते. सांसारिक नातेसंबंध, संपत्ती आणि मोहाचा त्याग करून आत्मसंयम, धर्मप्रसार आणि मानवसेवेसाठी आयुष्य अर्पण करण्याची ही परंपरा जैन समाजात अत्यंत पवित्र मानली जाते. पाथर्डीतील हा भगवती दीक्षा महोत्सव वैराग्य, संयम आणि अध्यात्मिक उन्नतीचा प्रेरणादायी संदेश देऊन गेला.