
Anna Hazare : पारनेर : डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विकास जसा सोयीस्कर ठरत आहे, तसाच तो आर्थिक फसवणुकीचे नवनवीन धोकेही निर्माण करत आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Crime) आणि आर्थिक फसवणुकीच्या काळात नागरिकांना जागरूक आणि सक्षम करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे (All India Consumer Panchayat) प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे यांनी लिहिलेले ‘सर्वसामान्यांची फसवणूक – मार्गदर्शन व उपाय’ हे पुस्तक एक महत्त्वाचे कवच ठरेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा : कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर; पाटील यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी
आपल्या अनुभवातून हे पुस्तक साकारले
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २३) राळेगण सिद्धी येथे पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त असल्याचे नमूद केले.गेल्या ३५ वर्षांपासून ग्राहक संघटनांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीविरोधात काम करणाऱ्या विलास जगदाळे यांनी आपल्या अनुभवातून हे पुस्तक साकारले आहे. नागरिक आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावेत, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अनेक महत्त्वाच्या विषयांचा आढावा (Anna Hazare)
या पुस्तकासाठी पद्मभूषण अण्णा हजारे व आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी शुभेच्छा संदेश दिले आहेत, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनिस यांनी प्रस्तावना लिहिली आहे. सध्याच्या डिजिटल आव्हानांचा विचार करता, या पुस्तकात अनेक महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने डिजिटल आणि ऑनलाईन आर्थिक फसवणूक नोकरीच्या आमिषाने होणारी फसवणूक आणि बनावट अधिकारी बनून केली जाणारी फसवणूक. ऑनलाईन शॉपिंग, बँकिंग व्यवहार आणि सोने-चांदी खरेदीतील धोके, अन्न-औषधांमधील भेसळ, वजन-मापातील फसवणूक, तसेच शेतीसाठी बियाणे व खते खरेदी करताना घ्यायची खबरदारी.
सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे
केवळ फसवणूक टाळण्याचे उपायच नव्हे, तर फसवणूक झाल्यास दाद कशी मागावी, तक्रार कोठे व कशी नोंदवावी, संबंधित कायदे कोणते आहेत आणि स्वतःची डिजिटल सुरक्षा प्रणाली कशी भक्कम करावी, याची सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक कुटुंबासाठी एक संग्रही मार्गदर्शक ठरणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी, शिक्षक हरिभाऊ चौधरी, बाजीराव जगदाळे आणि पत्रकार भगवान गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक नागरिकांसाठी एक उपयुक्त सुरक्षा कवच म्हणून काम करेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


