
Ashadhi Vari : नगर : आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतात. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला व सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे. वारी मार्गावरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून सुरक्षित, स्वच्छ व सुरळीत वारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
हेही वाचा : अडवणूक थांबवा,अन्यथा ‘या’ तारखेला पुन्हा आंदोलन;मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
यांची उपस्थिती
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, मानाच्या पालख्यांचे प्रमुख, विविध दिंडी प्रमुख तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नक्की पहा : मोहरमच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई
सर्वसमावेशक उपाययोजना (Ashadhi Vari)
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणांहून अनेक दिंड्या आपल्या जिल्ह्यामार्गे पंढरपूरकडे जातात. श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. वारी मार्गावरील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते खड्डेमुक्त करावेत. दिंडी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थापन चोखपणे करण्यात यावे. मुक्कामस्थळी चोरी, गैरप्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


