Bhim Jayanti:श्रीगोंदा: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती (Bhim Jayanti) श्रीगोंदा शहरात अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधींसह हजारो भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी आमदार विक्रम पाचपुते, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.
अवश्य वाचा- खरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची हजेरी; अंजली दमानियांचे गंभीर आरोप
सभेच्या समारोपानंतर मिरवणूक (Bhim Jayanti)
याप्रसंगी बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाची सीमा निश्चित होताच, सर्वानुमते योग्य जागेची निवड करून या निधीतून एक देखणे आणि प्रेरणादायी स्मारक उभारले जाणार असल्याचे सांगितले. सभेच्या समारोपानंतर मिरवणूक काढण्यात आली.दुपारी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. “जय भीम” आणि “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा घोषणांनी अवघे श्रीगोंदा शहर दुमदुमून गेले. सिद्धार्थनगर येथील आंबेडकर भवनपासून मिरवणूक सुरू होऊन विजय चौक, संत रोहिदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शनी चौकापर्यंत काढण्यात आली. सिद्धार्थनगरमधील मुलींनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या सोहळ्याचे यशस्वी नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, सिद्धार्थनगर यांच्या वतीने करण्यात आले होते. जिवाजी घोडके, गौतम घोडके, पप्पू घोडके, जुगल घोडके, धरम घोडके, गोरख घोडके, विशाल घोडके, संग्राम घोडके, शिवा घोडके, आनंद घोडके आणि अक्षय घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले. या उत्सवात महिला, बालके आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण शहरात सामाजिक सलोख्याचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



